खंडोबा देवाच्या यात्रेत शर्यतीचे आयोजन करण्याचा प्रयत्न
मंचर : आंबेगाव तालुक्यातील नागापूर-थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेत बैलगाडा शर्यती होऊ नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाने शनिवारी घाटात चार चर खोदून बैलांना पळविण्यासाठी प्रतिबंध केला आहे. बैलगाडे पळविल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी दिला आहे.
थापलिंग खंडोबा देवाची यात्रा सोमवार आणि मंगळवारी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बैलगाडा शर्यतींना बंदी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बैलगाडा घाटात खड्डे घेऊन बैलगाडे पळविण्यासाठी प्रतिबंध केला आहे. नागापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत श्री क्षेत्र थापलिंग येथील गडावर खंडोबा देवाची यात्रा उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. येथील यात्रेला नवसाचे बैलगाडे पळविले जातात, परंतु गेल्या सहा-सात वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला बंदी घातली आहे.
पोलिसांची उपाययोजना
येथील यात्रेत बैलगाडा पळवून न्यायालयाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी खबरदारीची उपाययोजना करीत बैलगाडा शर्यतीच्या घाटात जेसीबीने चार चर घेऊन खड्डे निर्माण केले आहेत. त्यामुळे बैलांना घाटात पळता येणार नाही. पर्यायाने बैलगाडा शर्यती होऊ नये, यासाठी पोलिसांनी उपाययोजना केली आहे. शनिवारी काही अज्ञात बैलगाडा मालक घाटात बैलगाडे पळविण्याच्या प्रयत्नात होते, अशी माहिती मंचर पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, सागर गायकवाड, प्रशांत भुजबळ, रामदास तनपुरे, राजेंद्र हिले, निलेश खैरे, संजय पोहकर, उत्तम शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे बैलगाडे पळाले नसल्याचा दावा पोलिसांनी केला.