बैलगाडीतून काढण्यात आली शैक्षणिक दिंडी

0

नंदुरबार। उन्हाळी सुटीला पूर्णविराम मिळून नवीन शैक्षणिक वर्षाला गुरुवारी सुरुवात झाली. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील आदिवासी सेवा सहायक व शिक्षण प्रसारक संस्था संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बिलबारा, येथे पारंपरिक पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिली व नवागत विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून मिरवणूक काढण्यात आली. शैक्षणिक जनजागृतीसाठी गावात रैली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थी शिक्षक व पालक, सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारेघाट येथे प्रवेशोत्सव व पालक मेळावा
नवापुर । कारेघाट येथील तालुक्यातील शेवटची शाळा माणिकरावजी विद्या प्रसारक संस्थेचे आईसाहेब सौ.सुरेखाताई माणिकरावजी गावीत अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कारेघाट येथे प्रवेशोत्सव व पालक मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन संस्था उपाध्यक्ष कुथ्या गावीत,कारेघाट सरपंच फत्तुबाई गावीत,तर विशेष उपस्थिती म्हणुन ए.अ.वि.प्रकल्प नंदुबार येथील भानुदास वसावे, दिलीप गावीत हे होते. कार्यक्रमाची सर्व प्रथम विद्यार्थी-पालक मान्यवर मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहभागाने प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीत सुरवातीस आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणार्या ढोल,व छिबली चे नृत्य सादर करण्यात आले होते. नंतर कार्यक्रमात नवोगतांचे व त्यांच्या पालकांचे स्वागत पुष्पगुच्छ देवुन करण्यात आले. इयत्ता 1ली ते 10 वी पर्यतच्या विद्यार्थ्याना वहया,पुस्तक व गणवेश वाटप, वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

नंदुरबार येथील कुलदिपक विद्यालयात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप
नंदुरबार । आदिवासी ज्ञानपीठ नवापूर संचलित कुलदिपक माध्यमिक विद्यालय, झामणझर (ता.नवापूर) येथे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम घेण्यात आला. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरपंच सुमा राया मावची व मुख्याध्यापक डी.बी.वाघ यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. तसेच नवीन प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता दहावी व बारावीचा शंभर टक्के निकाल लागल्याने एम.एस.गावीत, विजय गावीत, उर्मिला गावीत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.व्ही.बेहेरे यांनी केले.

मोठा प्रतिसाद, पालकांचा सहभाग
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.कार्यक्रमाचे फोटो व्हाटसअ‍ॅप ग्रुपवर टाकण्यात आले. कधी नव्हे एवढा मोठा प्रतिसाद शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत पहिल्यांदा पाहावयास मिळाला या कार्यक्रमाला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. या प्रसंगी पुस्तके आणि खाऊ यांचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच दप्तरांचे वाटप करण्यात आले. सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला. शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.

उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
नंदुरबार येथील सय्यद इमाम बादशाह शिक्षण संस्था, नंदुरबार संचलित उर्दू प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी इयत्ता पहिलीतील बालकांचे जोरदार स्वागत करुन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत दरवर्षी शाळेत दाखल होणार्या बालकांचे स्वागत करण्याच्या सुचना आहेत. त्यानुसार येथील सैय्यद इमाम बादशाह शिक्षण संस्था, नंदुरबार संचलित उर्दू प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी इयत्ता पहिलीत परिसरातील प्रवेशपात्र बालकांना प्रवेश देवून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सय्यद नईमोद्दीन व सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चॉकलेट व मोफत पाठ्य पुस्तके वाटप करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक खाटीक इमरान, शाळेतील शिक्षिका सैय्यद साजेदा, शेख नाजिया, शेख नुसरत, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदींनी परिश्रम घेतले.

मनोरंजनात्मक खेळ, ओळख
विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक खेळ, शिक्षकांशी ओळख करण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. विद्यालयात शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटामुळे पहिल्याचदिवशी सर्व शाळेतील शिक्षकांनी स्वत: शाळेच्या प्रवेशद्वारात उभे राहून विद्यार्थ्यांचे गुलाब फुल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेतील प्रत्येक वर्ग, नोटीस बोर्ड, वर्गातील फळे सजविण्यात आले होते.आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्पधिकारी निमा अरोरा यांनी प्रत्येक आश्रम शाळेत प्रकल्पाचा एक प्रतिनिधी पाठवून वेगळ्या पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा केला.

पुस्तक वाटप ,पाण्याची सुविधा
शहादा । जिल्हा परिषद मराठी शाळा सुलतानपूर येथे पुस्तक वाटप दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला सरपंच श्री.सुदामभाऊ माळी शा.व्य.स.अ.श्री दुग्रादास पवार,तंटा मूक्त समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील मा.प.स.शहादा,गणेश पाटील, भा.ज.पा.तालूकाध्यक्ष,किशोर पाटील,शिवसेनाध्यक्ष, पाडूंरंग पाटील, ग्रा.प.स.सौ.संगीता ठाकरे, दिलीप नाना,पो.पा.शिंदे आप्पा, विनोद पाटील,ग्रामसेविका पूनम पाटील ,मुख्या. दत्तात्रय अहीरे उपस्थित होते.कार्यक्रमात रत्नकात भोईटे यानी (शिक्षक) फिल्टर पाण्याची सुविधा त्यांच्या स्वखर्चाने उपलब्ध करुन दिली त्याचां सत्कार सरपंच सुदाम माळी यानी केला.सूत्रसंचंलन भोईटे सर यानीं केले होते.कार्यक्रमासाठी गोपाल पावरा,पंडीत रावताळे,भरत पाडवी,श्री वसावे यानी मेहनत केले.

गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
शहादा । येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नविन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आज सर्व शिक्षा अभियान अंतर्गत दिली जाणारी पुस्तके व विद्यार्थ्यांना आणि पालकांना गुलाब पुष्प देऊन शालेय परीवारातर्फे स्वागत करण्यात आले.पहिल्या दिवसाची आठवण विद्यार्थ्यांना स्मरण राहावी याकरिता आयोजन करण्यात आले होते .यावेळी संस्थेचे समन्वयक संजय राजपूत यांचे हस्ते पुस्तके वाटप करण्यात आली.प्रथम संजय राजपूत यांचे हस्ते सरस्वती मातेच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले. संस्थेचे विभागीय सचिव प्रा.संजय जाधव व वर्षा जाधव याच्या मार्गदर्शनाखाली झाला. कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य आर.जे. रघुवंशी, पर्यवेक्षक सुनिल सोमवंशी उपस्थित होते. समन्वयक संजय राजपूत यांनी विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक वर्षाचा शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी, शैक्षणिक प्रगती करावी असे आवाहन केले. प्रास्ताविक पी.एम.जाधव यांनी केले या वेळी सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.

जि.प.शाळांच्या वतीने प्रवेशोत्सव साजरा
शाळेत येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचा हा पहिला दिवस आठवणीतला दिवस म्हणून आठवणीत राहावा यासाठी नंदुरबार आदिवासीबहुल जिल्ह्यातील शासकीय,अनुदानित जिल्हा परिषद मराठी शाळांच्या वतीने प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांचे दणक्यात स्वागत केले. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळांना आजपासून सुरुवात झाली.शाळेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शाळेची इमारत फुग्यांनी सजविली होती, प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपआपल्या वर्गातल्या मुलांचे स्वागत केले. काही शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

नवागत विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत ; विद्यार्थ्यांचा जल्लोष
नवापूर । श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्याल येथे शाळेच्या पहिल्या दिवशी इयता 5 वीतील नवोदित प्रवेश करणारे विद्यार्थाचे गुलाब पुष्प व मिष्ठान्न देऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले. सकाळी इयत्ता पाचवीत प्रवेश घेणारे नवागत विद्यार्थी यांचे आगमन झाल्यानंतर शाळेचा प्रवेशद्वारा जवळ सर्वाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा हस्ते शालेय पुस्तके विद्यार्थाना वाटप करून नंतर विद्यार्थाना मिष्टान्न भोजन देण्यात आले.त्यानंतर शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस, नवीन शाळा पाहून नवागत विद्यार्थाचा चेहर्यावर आनंद व उत्साह दिसून आला.यावेळी मुख्याध्यापक आर व्ही पाटील, उपमुख्याध्यापक अनिल पाटील, उपप्राचार्य एस आर पहुरकर, पर्यवेक्षक प्रविण पाटील, विनोद पाटील,भरत पाटील, कमल कोकणी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते प्रसंगी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शालेय पुस्तकांचे वाटपही करण्यात आले शाळेचा पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले यावेळी ग्रंथपाल सुनील लाड उपस्थित होते.