सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. निर्मित अवधूत गुप्ते प्रस्तूत बॉईजमध्ये झळकण्याची संधी पुण्यात राहणार्या सुमंत शिंदेला मिळाली आहे. हा मराठी सिनेमा 8 सप्टेंबर रोजी रसिकांच्या भेटीला येत आहे. बॉईज सिनेमाचे निर्माते लालासाहेब शिंदे व राजेंद्र शिंदे असून दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले आहे. बॉईजमध्ये पार्थ भालेराव, प्रतिक लाड, संतोष जुवेकर, शिल्पा तुळसकर, वैभव मांगले, शर्वरी जेमिनीस, ऋतिका श्रोत्री, श्रीकांत यादव व झाकिर हुसेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बॉईज सिनेमाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत सुमंत शिंदे या नव्या हँडसम बॉयने पदार्पण केले आहे. यावेळी सुमंतने चित्रपटसृष्टीत करियर करण्याची इच्छा व्यक्त केली. भूमिकेबद्दल माहिती देताना सुंमंत म्हणाला कि, बॉईजमध्ये कबीर नावाचे पात्र मी रंगवले आहे. एकाच प्रश्नात अडकून पडल्याने आईशी त्याचे सतत मतभेद होतात. तो होस्टलमध्ये राहतो. पुस्तकी किडा, पण कहिसा चिडचिडा, सर्व काही जिंकणारा पण आनंद न घेणारा अशी व्यक्तीरेखा आहे.
चित्रिकरणाचा अनुभव सांगताना सुमंत म्हणाला कि, बॉईज हा माझा पहिलाच सिनेमा आहे. त्यातच राष्ट्रीय पुरस्कार विजेता पार्थ, संतोष जुवेकर, वैभव मांगले, झाकिर हुसेन, भाऊ कदम, श्रीकांत कदम अशा कसलेल्या मोठ्या कलावंतांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मला चित्रपटक्षेत्रातच करियर करायचे आहे. लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड आहे. मी अकरावीला असतानाच बॉईजची स्क्रिप्ट माझ्याकडे आली. त्यानुसार ऑडीशन दिली. कबीरच्या पात्रासाठी माझी निवड झाली. यासाठी आम्ही 6 महिने कार्यशाळा घेतली. आता अभिनयावरच लक्ष केंद्रित करणार आहे. बॉईज हा सिनेमा कुटुंबातील सर्वांनी एकत्र बघावा, असा असल्याचे सुमंत सांगतो.