बॉक्सिंगला प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरात ॲकॅडमी उभारणार!

0

राज्यातील 32 खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती, एशियाड व ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला सुरुवात

नागपूर : बॉक्सिंग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात बॉक्सिंग ॲकॅडमी सुरु करण्यात येवून खेळाडूंना बॉक्सिंगसोबतच इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील खेळाडू व खेळांच्या विविध प्रकाराला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या वर्ग-1 व वर्ग-2 या पदावर 32 खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे खेळाकडे एक करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात करा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवून राज्याचा व देशाचा लौकिक वाढवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.  नागपूर महानगरपालिका व नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशन, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने सब ज्युनियर गर्ल्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पीयनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पदक देवून गौरव करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, देशातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये घवघवीत यश मिळवित आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील देदीप्यमान यश आपण सर्वजण पाहात आहोतच. खेळ हे मोठे करिअर असून याला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातही विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे. विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये अव्वल यश संपादन केलेल्या खेळाडूंना थेट भरतीद्वारे शासन सेवेत समाविष्ठ करुन घेण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले. ही बाब नागपूरसाठी गौरवास्पद आहे. बॉक्सिंग क्षेत्रातील मेरीकोम हे अनेकांचे आदर्श स्थान असून अशाप्रकारच्या स्पर्धांमधून भावी मेरीकोम तयार होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातून एशियाड व ऑलिम्पिकच्या सन 2020 व 2024 या स्पर्धांसाठी देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यासाठी खेळाडूंना आवश्यक सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले,आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे आगामी स्पर्धांमध्येही राज्यातून सर्वाधिक पदक विजेते खेळाडू राहतील,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.