जळगाव । सोमवारी असलेल्या रमजान ईदच्या पार्श्वभुमीवर रविवारी सायंकाळी ईदगाह मैदानाची बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून (बीडीडीएस) तपासणी करण्यात आली तर जिल्हा पोलिस दलातर्फे शहरातील संवेदनशिल भागांमध्ये पोलिसांचे पथसंचलनही घेण्यात आले. यावेळी पोलिस अधिकारीव व कर्मचार्यांनी पथसंचलन झालेल्या संपूर्ण संवेदनशिल परिसराची माहिती घेतली.
मुस्लीम बांधवांचा पवित्र सण समजला जाणारा रमजान ईद सण सोमवारी आहे. त्यामुळे पोलिस दलातर्फे शहरातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील संवेदनशिल भागांमध्ये पोलिसांचे पथसचंलन करण्यात आले. दरम्यान, शहर, शनिपेठ, जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सकाळीच अधिकार्यांच्या उपस्थितीत पथसंचलन झाले तर सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तांबापूरा परिसरात तर रामानंदनगर पोलिस ठाण्यातील हद्दीतील पिंप्राळा येथे पथसंचलन करण्यात आले. यावेळी दोन्ही पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक, पाच सहाय्यक पोलिस निरीक्षक, 20 होमगार्ड, क्युआरटी पथक आदींचा सहभाग होता. तर सायंकाळी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ईदगाह मैदानाची व परिसरात बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून (बीडीडीएस) तपासणी करण्यात आली. या पथकाचे प्रमुख ईश्वर सोनवणे, हेड कॉन्स्टेबल सुनील बडगुजर, रेवानंद साळुंखे, काजीद देशमुख, शशिकांत बाविसकर यांनी तपासणी केली.