बॉम्बस्फोटाने काबुल हादरले, 95 ठार

0

तालिबानने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली; 150 जण अत्यवस्थ

काबुल : स्फोटकांनी भरलेल्या रुग्णवाहिकेचा गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणत दहशतवाद्यांनी नृशंस रक्तपात केला. या भीषण स्फोटाने अफगाणिस्तानची राजधानी काबुल अक्षरशः हादरले असून, या स्फोटात 95 जण ठार तर 150 जण गंभीर जखमी झाले आहेत. या रक्तपाताची जबाबदारी तालिबान या कुख्यात दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. युरोपीय संघांसह अनेक शासकीय कार्यालये असलेल्या अगदी गर्दीच्या ठिकाणी हा स्फोट घडविण्यात आला. हा स्फोट इतका भयानक होता की सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत त्याचा आवाज दणाणला. स्फोटानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली. त्यात अनेकजण चेंगारले गेल्याचे आरोग्य विभागाचे प्रवक्ते वहीद मजरुह यांनी सांगितले. मृत व जखमींना शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारतासह युरोपीय राष्ट्रे व संयुक्त राष्ट्रसंघाने या स्फोटाचा निषेध नोंदविला आहे.

रुग्णवाहिकेचा स्फोटासाठी वापर
अफगाण गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले, की दोन किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटाचा आवाज पोहोचला होता. तसेच, 100 मीटर अंतरापर्यंत स्फोटाची भीषणता दिसून आली. काही उंच इमारतीही कोसळल्यात. आत्मघाती दहशतवाद्यांनी स्फोट घडविण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला होता. या रुग्णवाहिकेत रुग्ण असल्याची बतावणी करून आत्मघाती हल्लेखोराने सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकली. पहिली तपासणी चौकी पार केल्यानंतर दुसर्‍या चौकीवरील सुरक्षा यंत्रणांना संशय आल्यानंतर त्याने स्वतःसह स्फोटके भरलेली गाडीच उडवून दिली. तालिबानने सोशल मीडियाद्वारे या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. इटलीस्थित एनजीओ इमरजेन्सीने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात 95 जण ठार झाले असून, 150 जखमींना विविध रुग्णालयात नेण्यात आले होते. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रक्ताने माखलेल्या जखमींना उपस्थितांनी ढिगार्‍या बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ केल्याची दृश्ये विविध दूरचित्रवाहिन्यांवर दिसून येत होती.

शांततेच्या चर्चेला गालबोट
काबुलमधील या सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी उच्च शांती परिषदेचे कार्यालयदेखील असून, या कार्यालयाद्वारे तालिबानसोबत शांततेसाठी वाटाघाटी सुरु आहेत. याच कार्यालयाला लक्ष्य करून हा स्फोट घडविण्यात आला असावा, अशी शक्यता परिषदेचे सदस्य हसिना सफी यांनी व्यक्त केली. स्फोट अत्यंत शक्तिशाली होता. त्यामुळे इमारती कोसळल्या, खिडक्यांची तावदाने फुटली, सुदैवाने युरोपीय संघाची कार्यालये व विदेशी नागरिक सुरक्षित असल्याची माहिती हाती आली आहे.

अंगावर शहारे आणणारे दृश्य
ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हा भीषण स्फोट घडवून आणला, त्या तपासणी नाक्याच्या परिसरात मृतदेहांचा खच आणि रक्ताचा सडा पडला होता. जखमींना जवळच्या जामुरत रूग्णालयात तातडीने हालविण्यात आले. रूग्णालयातील डॉक्टर जखमींना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न करत होते. रूग्णालयाच्या व्हरांड्यात रक्ताने माखलेले जखमी स्त्री-पुरूष व मुलांना ठेवण्यात आले होते. येथील दृश्यही अंगावर शहारे आणणारे होते. काही दिवसांपूर्वीच काबुलमधील इंटरकाँटिनेंटल हॉटेलमध्ये झालेल्या स्फोटात 20 जण मृत्युुमुखी पडले होते. काबुलमधील संसदेचे प्रतिनिधी मीरवाइस यासिनी या स्फोटाच्यावेळी घटनास्थळाजवळ उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, तपासणी नाक्याजवळ असताना रुग्णवाहिकेत मोठा स्फोट झाला. त्यानंतर अनेक लोक जमिनीवर पडले होते.