अभिनेत्री श्रीदेवीचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन
मुंबई : सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाचे जन्मजात वरदान लाभलेली अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. दुबईतील विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह दुबईत होत्या. मात्र, दुसरी मुलगी जान्हवी कपूर चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे दुबईत गेली नव्हती. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. वडील पेशाने वकील होते. श्रीदेवी यांना एक सख्खी आणि दोन सावत्र बहिणी आहेत. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मॉम हा श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
वयाच्या चौथ्या वर्षी चित्रपटात
श्रीदेवी यांना लहानपणापासूनच अभिनय व नृत्याची आवड होती. 4 वर्षांची असतानाच थुनीवावन या चित्रपटातुन एक बाल कलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात केली. पुढे 1971 साली पूमबत्ता या एका मल्याळम चित्रपटात त्यांनी अभिनय केला. दरम्यान त्यांना केरला स्टेट फिल्म यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड, राजकरण आणि सोशल मीडियात शोक व्यक्त करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रजनीकांत, कमल हसन, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉनी लिव्हर, प्रियांका चोप्रा, प्रिती झिंटा, नेहा धुपिया, झरिन खान यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रियांका चोप्राने शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले की, माझ्याकडे शब्द नाहीत. सर्वांकडून श्रीदेवींना श्रद्धांजली. आजचा काळा दिवस.
100 हुन अधिक चित्रपटात काम
पुढे जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर श्रीदेवीने 1979 साली सोलावा सावन या चित्रपटातुन आपल्या हिंदी अभिनय कारकिर्दिची सुरवात केली. खरेतर श्रीदेवी ज्युली या सिनेमातीही झळकली होती. मात्र त्यात तिची भूमिका छोटी होती. सोलवा सावननंतर मात्र तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदमम, नगीना, घर संसार, नया कदम, मकसद, सुल्तान, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश यांसारख्या तब्बल 100 हुन अधिक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. अलिकडे मुलगी जान्हवी कपूरला अभिनयाचे धडे देण्यात त्या व्यस्त होत्या. 90 च्या दशकात अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्यात एकप्रकारे पुढे जाण्यासाठी चढाओढ लागून होती. मात्र श्रीदेवीने आपले नंबर वनचे स्थान कायम अबाधित ठेवले.
न जाने क्यूँ, एक अजीब सी घबराहट हो रही है
श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी बाहेर येण्यापूर्वी अभिनेते अमिताभ बच्चन यांना एक ट्विट केले होते. न जाने क्यूँ, एक अजीब सी घबराहट हो रही है!! असे ट्विट करत त्यांनी आपल्या मनातील भिती व्यक्त केली होती. त्यांच्या या ट्विटनंतर काहीवेळात श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी आली. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना आधीच या दुख:द घटनेची मनात भीती वाटत होती का? किंवा अमिताभ बच्चन यांना श्रीदेवी यांच्या कुटुंबियांनीच ह्रदयविकार झटका आला त्यावेळी कळवले होते? अशीही शक्यता वर्तविली जात आहे.
श्रीदेवी यांचा शेवटचा व्हिडिओ
गायक सोनू निगम यांनी श्रीदेवी यांचा शेवटचा व्हिडिओ ट्विट केला आहे. श्रीदेवी त्यांच्या कुटुंबीयांसह दुबई येथे लग्नसोहळ्यासाठी गेल्या होत्या. त्याच लग्न सोहळ्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या कोसळल्या. त्यातच त्यांचा अंत झाला. श्रीदेवी ज्या विवाह सोहळ्यासाठी दुबईत गेल्या होत्या तेथील व्हिडिओ गायक सोनू निगम यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्या अत्यंत आनंदी आणि प्रसन्न दिसत आहेत. त्या जातील याची कल्पनाही कोणी केली नसावी असेच हा व्हिडिओ पाहिला असता जाणवते. दुर्दैवाने हा त्यांचा शेवटचा व्हिडिओ ठरला आहे.
प्रेरणादायी अभिनय : राष्ट्रपती
श्रीदेवी यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट केले की, सिनेअभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. अनेक चाहत्यांची मनं दुखावून त्या अकाली निघून गेल्या. त्यांचे मूंद्रम पीराई, लम्हे आणि इंग्लिश-विंग्लिश सारखे सिनेमे इतर अभिनेत्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात आम्ही सर्व सहभागी आहोत.
कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी : पंतप्रधान
अभिनेत्री श्रीदेवींच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले की, प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हिच इश्वरचरणी प्रार्थना.
अष्टपैलू अभिनेत्री हरपली : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री आपण गमावली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, काँग्रेस नेते संजय निरूपम, लेखक चेतन भगत यांनीही ट्विटरवरून श्रीदेवी यांना आदरांजली वाहिली आहे तसेच आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.
धक्का बसला
ही बातमी ऐकून मोठा धक्का बसला. आम्ही याचा कधीही विचारही केला नव्हता. त्यांनी आपल्या प्रतिभेने सर्वांनाच प्रभावित केले होते. त्या सर्वोत्तम अभिनेत्री होत्या. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीचे मोठं नुकसान झाले आहे.
हेमा मालिनी, अभिनेत्री
कार्डिअॅक अरेस्टमुळे श्रीदेवी यांचा मृत्यू
अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाला. हृदयाची क्रिया अचानक बंद पडते तेव्हा कार्डिअॅक अरेस्ट येतो. कार्डिअॅक अरेस्टमध्ये रक्ताभिसरण आणि हृदय धडधडण्याची प्रक्रिया बंद होते. रक्ताभिसरण बंद झाल्याने अवयवांना होणारा रक्तपुरवठा बंद होतो. मेंदूला होणारा एक रक्तपुरवठाही बंद होतो आणि मृत्यू होतो. हृदयविकार नसेल तरीही कार्डिअॅक अरेस्ट येऊ शकतो. कार्डिअॅक अरेस्ट येणार्या लोकांपैकी 25 टक्के लोकांना तर कोणतीही अस्वस्थता किंवा काही लक्षणेही जाणवत नाहीत.