मुंबई । बॉलिवूडची प्रेमळ आई म्हणून प्रसिद्ध झालेली आणि ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागल्याने कुटुंबिय त्यांना जवळच्या कोकिलाबेन रुग्णालयात घेऊन गेले. तिथे उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मराठी रंगभूमीपासून सुरुवात करणार्या रिमा लागू यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त चित्रपटसृष्टीसह सर्वांसाठीच एक धक्का आहे.
‘रिमा लागू उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. टीव्ही आणि सिनेमांच्या जगात त्यांनी आपला खोलवर ठसा उमटवला होता’,
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
हे सर्व अचानक कसे झाले, याचा मला धक्का बसला आहे. माझा मोठा आधार हरपला आहे.
आशा वेलणकर, रिमाजींची मोठी बहीण
रीमा लागू यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दु:ख झालं आहे. इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
लता मंगेशकर
रीमा लागू यांच्या निधनाची धक्कादायक आणि अविश्वसनीय बातमी ऐकली. खूप सुरेख आणि हुषार अभिनेत्री होत्या. खूपच दु:खद आहे.
अमिताभ बच्चन
चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी या तीनही माध्यमांत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणार्या रिमा लागू यांच्या निधनाने एक चतुरस्त्र अभिनेत्री गमावली आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री