बॉलीवूड सेलिब्रिटीच्या हत्येचा कट उधळला!

0

लखनऊ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने खान मुबारक या शार्प शूटरला लखनऊमधील पीआयजी परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला असून, तो बॉलीवूडमधील एका सेलिब्रिटीच्या हत्येसाठी तयारी करत असल्याचे उघड झाले आहे. मुबारक हा छोटा राजनच्या टोळीसाठी काम करत असून, छोटा राजनविरोधात काम करणार्‍या टोळ्यांना संपवण्यातही खान मुबारकचा हात आहे.

अज्ञातस्थळी चौकशी
छोटा राजनचा विश्वासू सहकारी झफर सुपारी याच्या सांगण्यावरून खान मुबारक बॉलीवूडमधील एका सेलिब्रिटीच्या हत्येचा कट रचत होता. तत्पूर्वीच त्यास अटक केल्याने हा कट उधळला गेला. उत्तर प्रदेश पोलिसांना एका बॉलीवूड सेलिब्रिटीचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. दरम्यान, खान मुबारक नक्की कोणत्या बॉलीवूड सेलिब्रिटीची हत्या करणार होता व का यासंदर्भात अद्याप पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. मुबारकची अज्ञातस्थळी कसून चौकशी करण्यात आली.

छोटा राजन टोळी सक्रीय
अटक करण्यात आलेला शार्प शूटर खान मुबारक हा छोटा राजनचा विश्वासू सहकारी झफर सुपारी याचा भाऊ आहे. झफर सुपारीच्या भावाला अटक झाल्याने छोटा राजन टोळीला हा मोठा हादरा असल्याचे सांगितले जाते. छोटा राजन तुरुंगात असला तरी त्याची टोळी सक्रीय असल्याचे खान मुबारक याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. 25 ऑक्टोबर 2015 मध्ये छोटा राजनला इंडोनेशियाच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला भारताकडे सोपविण्यात आले आहे. छोटा राजनच्या नावावर खंडणी, तस्करी, अंमली पदार्थांची वाहतूक आणि हत्या असे एकूण 85 गुन्हे आहेत.