बोंडअळीच्या प्रादुर्भामुळे कापसाचे नुकसान; भरपाईची मागणी

0

अमळनेर । तालुक्यातील कोरड व बागायती क्षेत्रातील कापूस पिकांचे बोंड अळीच्या प्रादुर्भावाने लाखोंचे नुकसान झाले असून संपुर्ण पिक वाया गेलेले आहे. महसूल व कृषी विभागाने पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. तालुक्यात कपाशी हे मुख्य पीक असल्याने त्याची लाखो हेक्टर वर कोरड व बागायत लागवड करण्यात आली आहे. सुरवातीपासूनच कपाशी ह्या पिकाने चांगला बहार घेतला होता. परंतु ऐन फुलफुगडी व कैरी तयार होण्याच्या काळात बोंड अळीचा प्रादुर्भाव व बदलते हवामानामुळे कापसाचा बोंडाचा आकार कमी होऊन किडलेला कापूस शेतकर्‍यांच्या हातात आला. त्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाली कपाशी किडल्या सारखी दिसत असल्याने त्यास भाव ही कमी मिळत आहे, अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी कापूस लागवडीपासून केलेला खर्च वाया जाणार असून टाकलेल्या मुद्दल सुद्धा उत्पनातून निघणार नसल्याने शेतकरी चिंतातुर आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

उत्पन्नात कमालीची घट
राज्यात बदलत्या हवामानामुळे बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रत्येक जिल्ह्यात दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे कापूस हे पीक धोक्यात आले, असून फुगडीसह बोंड देखील झाडावरून खाली जमिनीवर पडत आहेत तर उरलेल्या बोंडातून किडलेल्या कापूस निघत आहे. कपाशी लागवड झालेल्या प्रत्येक क्षेत्रात ही परिस्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे कपाशीचे वाणाची लागवड केलेली असली तरी प्रत्येक वाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव आहेच, बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता सर्वच शेतकऱयांचे कमी अधिक नुकसान झालेले असल्याने महसूल व कृषी विभागाने पंचनामे करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.