बोंडअळी, तुडतुडेबाधितांना देणार सगळे पैसे 

0
एसडीआरएफमधून मदतीचा तिसरा हप्ता १५ दिवसात देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन 
कंपन्यांकडील भरपाई प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई
नागपूर – बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक आणि तुडतुडेबाधित धान शेतकऱ्यांना पीक विमा, राज्य आपत्कालीन मदत निधीतून मदतीचे वाटप सुरु आहे. बीटी बियाणे कंपन्यांकडून भरपाईची प्रक्रिया सध्या सुरु असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सगळे पैसे दिले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. तसेच बियाणे कंपन्यांकडून भरपाई मिळवून देण्यात दिरंगाई करणाऱ्या कृषी खात्यातील अधिकाऱ्यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. विरोधकांच्या २९३ अन्वये प्रस्तावावर सोमवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले. मात्र, बोंडअळीग्रस्त आणि तुडतुडेबाधित शेतकऱ्यांच्या मदत बाटपाबाबत विरोधकांच्या प्रश्नांवर खोत यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सोमवारी रात्री विधानसभा सभागृहात ठिय्या आंदोलन केले.
विरोधी पक्षनेत्यांनी रात्री उशिरापर्यंत दिला ठिय्या 
बोंडअळी, मावा आणि तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने डिसेंबर 2017 मधील हिवाळी अधिवेशनातील घोषणेप्रमाणे मदत न दिली असा विरोधकांचा आक्षेप होता. सरकार घोषणेप्रमाणे संपूर्ण मदत नेमकी केव्हा देणार, याची ठाम घोषणा झाल्याशिवाय आपण सभागृहाबाहेर पडणार नाही, असा इशारा विखे पाटील यांनी दिला होता. त्यानुसार सोमवारी रात्री उशिरा सव्वाबाराच्या सुमाराला विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर विखे पाटील यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहातच ठिय्या मांडला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे यांच्याशी संवाद साधत बोंडअळी, मावा, तुडतुडाची मदत देण्यात विलंब झाल्याचे मान्य करून यासंदर्भात मंगळवारी सकाळी 11 वाजता कामकाज सुरू होताच विधानसभेत निवेदन करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे मदतवाटपामध्ये दिरंगाईसाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याचाही शब्द त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच निवेदन करण्याची भूमिका घेतल्याने विरोधकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते.
दरम्यान, मंगळवारी विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भातील निवेदन केले. मुख्यमंत्री म्हणाले, बोंडअळी आणि तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तीन पद्धतीने मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार पीक विम्यासाठी ४४ लाख शेतकऱ्यांनी दावा दाखल केला होता. त्यापोटी २,३६७ कोटी रुपयांची मदत मंजूर असून त्याचे वाटप सुरु आहे. बोंडअळी, तुडतुडे आणि दुष्काळातील नुकसानीपोटीची ही मदत आहे. बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १२ हजार रुपयांप्रमाणे पैसे दिले जात आहेत. पीक विम्यातून ४४ लाख शेतकऱ्यांपैकी ३८ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याचे पैसे जमा केल्याचे त्यांनी एका उत्तरात स्पष्ट केले. तसेच जे शेतकरी कंपन्यांच्या चुकांमुळे विम्यापासून वंचित आहेत अशांसाठी स्पेशल टास्क फोर्स नेमून विम्याचा लाभ मिळवून दिला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
दुसरे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत दिली जाईल शासनाने सांगितले होते. केंद्राकडून एनडीआरएफमधून अजूनही पैसे मिळालेले नाहीत, याची कबुली देत ते म्हणाले, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाने राज्य आपत्ती निवारण निधीतून पैसे उपलब्ध करुन दिले आहेत. यातूनही आतापर्यंत १,००९ कोटी रुपये वाटप केले आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी १३,५०० रुपयांप्रमाणे ही मदत दिली आहे. या मदतीचा तिसरा हप्ता येत्या पंधरा दिवसात वितरीत केला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी नंतर स्पष्ट केले.
तिसऱ्या पद्धतीत बीटी बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे शासनाने सांगितले होते. या प्रक्रियेत शेतकऱ्यांकडून नुकसानीचे जी नमुन्यातील अर्ज भरुन घेतले. १४ लाख शेतकऱ्यांनी हे अर्ज भरुन दिले आहेत. पुनरावृत्ती टाळून त्यापैकी ८ लाख ८ हजार बाधित शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरु आहे. कृषी खात्याच्या १,७०० प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामे केले. कृषी विद्यापीठ, कंपन्या आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी एच नमुन्यातील अर्जांचे प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडे सादर केले आहेत. संचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात पहिल्या टप्प्यात सात लाख अर्जांवर सुनावणीची प्रक्रिया सुरु आहे. त्यापैकी १ लाख ५५ हजार शेतकऱ्यांच्या अर्जांवरची सुनावणी पूर्ण झाली आहे. या शेतकऱ्यांना ९६ कोटी ३० लाख रुपयांच्या भरपाईचे दावे कंपन्यांना सादर केले आहेत. ८ ते १५ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाईचा यात समावेश आहे. या प्रक्रियेला विलंब लागणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बियाणे कंपन्यांकडील भरपाईच्या प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. बियाणे कंपन्यांकडून भरपाई मिळवण्यात विलंब होत असला तरी शेतकऱ्यांचे सगळे पैसे देणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पीक विम्याचे पैसे वितरीत केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी केली. ती यादी प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात काहीकाळ गोंधळ घातला.