बोंड अळीची रक्कम शेतकर्‍यांच्या बँकेत जमा न झाल्यास तहसीलला कुलूप ठोकणार

0

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे यांचा पत्रकार परीषदेत ईशारा

नंदुरबार- तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात येत्या आठ दिवसात बोंडअळीचे पैसे जमा न झाल्यास तहसीलदार कार्यालयात कुलूप ठोकणार असल्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे, तालुकाप्रमुख रमेश पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिला. ते म्हणाले की, गेल्या वर्षाच्या हंगामात बोंडअळीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकर्‍यांना अनुदान देण्यासाठी शासनाने युनियन बँकेत रक्कम पाठवली आहे या गोष्टीला आता दीड महिना होत आला आहे. असे असतांना केवळ पाच गावांनाच पैसे देण्यात आले आहेत. उर्वरित सर्व गावे शासन अनुदानापासून वंचित आहेत, तहसीलदार आणि गावातील तलाठी यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा होत नाही, यासाठी तलाठी शेतकर्‍यांकडून पैशांची मागणी करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. येत्या आठ दिवसात शेतकर्‍यांच्या खात्यात बोंडअळीचे पैसे जमा न झाल्यास तहसीलदार यांच्या कार्यालयात कुलूप ठोकण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे यांनी पत्रकार परीषदेत बोलतांना दिला.