सोयगाव । तालुक्यातील सावळदबारा परिसरात शेतकर्यांनी नगदी पिकाच्या आशेने कापसाला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. मात्र बोंड अळीच्या प्रादुर्भामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, शेतकर्यांनी शेतीवर केलेला खर्चही निघेल की नाही, अशी चिंता आहे. या बोंड अळीचा उद्रेकामुळे शेतकरी हवालदिल झाला असून हिरवेगार दिसणारे बोंड आतुन पोखरले जात असल्याने कापसाचा हंगाम हातचा जवळपास गेल्यात जाम आहे. यंदा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील कपाशीचे पीक चांगले होईल, अशी आशा शेतकरी बाळगत होते. परंतु एक महिनापुर्वी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व कपाशी धोक्यात सापडली शेतकर्यांनी महागड्या औषधांची फवारणी करीत खत पाणी घालत उरलेली कपाशी जगवली.
निसर्गाच्या लहरीपणामुळे बिघडले शेतीचे गणित
शेतकर्यांचे नगदी पीक म्हणून कपाशीची ओळख आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून शेतीचे निसर्गाच्या लहरीपणामुळे गणित बिघडत चालल्याने शेतकरी हवालदिल झाला. सावळदबारा सह मोलखेडा, नांदाताडा, चारूतांडा, पिपळवाडी, टिटवी, महालब्धा, पळसखेडा, नादागाव, मूर्ती, देव्हारी, डाभा, रवळा, जवळा, हिवरी आदी परिसरात कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकर्यांच्या झालेल्या कपाशी नुकसानीचे तात्काळ कृषी विभागाने पंचनामे करावे, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते व सावळदबारा भागातील शेतकरी करित आहे.