बोगद्यात क्रेन तुटली; 9 कामगार ठार

0

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील अकोले येथे नीरा – भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या बोगद्यातून वर येताना कामगारांना घेऊन येणार्‍या क्रेनचे वायररोप तुटल्याने ही क्रेन तब्बल 200 फूट खोलवर बोगद्यात कोसळली. या भीषण अपघातात नऊ कामगार ठार झाले आहेत. सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ठार झालेले कामगार हे उत्तरप्रदेश, ओदिशा, आंध्रप्रदेश या परराज्यातील होते. रात्री उशिरापर्यंत सात कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. दोन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेच्या चौकशीचे आदेश जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिले आहेत. घटनेची माहिती कळताच, पुणे, इंदापूर येथून रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या व जवान तातडीने रवाना झाले होते. तहसीलदारांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांनीही तातडीने धाव घेतली होती. केंद्र सरकारच्या महत्वांकांक्षी नदीजोड प्रकल्पांतर्गत या प्रकल्पाच्या बोगद्याचे काम वेगात सुरु असून, तावशी ते डाळज या 24 किलोमीटरच्या अंतरावर सहा टप्प्यात हे काम होत आहे. काही ठिकाणी शंभर तर काही ठिकाणी दोनशे फूट खोल हा बोगदा खोदण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

प्रकल्पात सुमारे 300 कामगार कार्यरत
केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम तावशी ते डाळज या 24 किलोमीटर अंतराच्या सहा टप्प्यात वेगाने सुरु आहे. नीरा नदीच्या तावशी येथून उजनी धरणाच्या डाळजपर्यंत बोगद्याद्वारे नदीजोड प्रकल्पाचे काम अकोले, काझड, डाळज या ठिकाणी तीन शॉफ्टमध्ये सुरु आहे. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर शॉफ्ट खोदून बोगद्याची खोदाई सुरु असून, या ठिकाणी जमिनीवरून सुमारे शंभर फूट खोल खाली खोदाई करून बोगद्याद्वारे आत मशीनच्या साहाय्याने खोदाई सुरु आहे. या कामासाठी तीनशे कामगार काम करीत आहेत. बोगद्यात जेसीबी मशीन, मालवाहतूक करण्यासाठीची वाहने यांच्या सहाय्याने काम सुरु आहे. या कामाची सुरूवात 2012 साली झाली होती. मात्र सरकारकडून निधी मिळत नसल्याने मध्यंतरी दोन वर्षे काम बंद होते. आता काम वेगाने सुरू आहे. तावशी ते डाळजपर्यंत सोमा आणि मोहिते ही कंपनी काम करत आहे. या नीरा-भीमा नदीस्थिरीकरण जोडबोगदा प्रकल्पाचा मुख्य हेतू नीरा नदीतून येणारे पाणी उजनी धरणात वळवून उस्मानाबाद, सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील शेती तसेच नागरिकांना हे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आणखीही कामगार दबल्याची भीती
अकोले परिसरातील या प्रकल्पाच्या शाफ्ट नं. 5 येथे ही दुर्घटना घडली असून, 200 फूट खोल बोगदा तयार करण्यात येत होता. या बोगद्यातून बाहेर येताना क्रेन उलटली. त्यामुळे अपूर्णावस्थेत असणारे येथील बांधकाम कोसळले. त्याखाली दबून नऊ कामगार ठार झालेत, आणखीही कामगार दबले गेले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात होती. अग्निशामन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचले असून, त्यांनी बचावकार्य सुरू केले होते. पोलिस व स्थानिक नागरिकांच्या सहाय्यानेही बचावकार्य हाती घेण्यात आले होते. घटनास्थळी मोठी गर्दीही जमली होती. या घटनेची माहिती पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही देण्यात आली होती. या बहुचर्चित प्रकल्पातील हा पहिलाच अपघात आहे.