बोगस अधिकार्‍यांना चोप

0

साक्री । ‘अ‍ॅन्टी करप्शन कमिटी (ऑल इंडिया)’, असे लाल अक्षरात काचेवर लिहलेल्या नव्या कोर्‍या बोलेरो गाडीतून येवून अधिकारी असल्याचा रुबाब दाखवत रेशन दुकानदाराकडे लाच मागणार्‍या तिघांपैकी दोघा भामट्यांची दुकानदारासह गावातील लोकांनी धुलाई केल्याची घटना तालुक्यात घडली आहे. धुलाई झाल्यानंतर दोघा भामट्यांना साक्री पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. त्यांच्या एका फरार साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. साक्री तालुक्यातील भोंनगाव येथील रेशन दुकानदार दिनेश यशवंत बोरसे यांच्याकडे आज सकाळी लाचलुचपत विभागाचे अधिकारी म्हणून तीन भामटे आले. त्यांनी बोरसे यांना धमकावून कागदपत्रांची,रेशन मालाबाबत विचारपुस केली. त्यानंतर बोरसे यांच्याकडे लाचेची मागणी केली.

शासनाने नियुक्त केला असल्याचा दावा
रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी बोरसे यांच्याकडे आले. संतप्त रेशन दुकानदारांनी या तीन भामट्यांना चोप दिल्याचे समजते. चोप दिला जात असतांना यातील एक भामटा पसार झाला आहे. दोघां भामट्यांची धुलाई केल्यानंतर त्यांना साक्री पोलिसात नेण्यात आले. विशेष म्हणजे या भामट्यांकडे एम.एच.18 टीसी 90 क्रमांकाची नवी कोरी बोलेरो गाडी देखील मिळून आली आहे. दिनेश बोरसे यांनी साक्री पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आज सकाळी 10 वाजता माझ्या आईच्या नावे असलेल्या रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांना धान्य वितरित करीत असतांना राजेश शत्रक पाडवी (वय 49),अमोल अशोक गावीत (वय 33)आणि अंकित विश्‍वास वळवी (वय 25) तिघे रा.बोरपाडा ता.नवापूर हे बोलेरो गाडीतून आले. त्यांनी मला दुकानाबाबत, लाभार्थ्यांची संख्या आणि रेशनच्या वितरणावर माहिती विचारण्यास सुरुवात केले. मी ओळख देण्यास सांगितले असता त्यांनी शासकिय अधिकार्‍यांना जाब विचारतात का? तुम्ही लोक चोर आहात, तुम्ही काय घोटाळे करतात आम्हाला माहित आहे,असे म्हणत धमकावले. तुमच्या दुकानांची चौकशी करण्यासाठी शासनाने आमची नेमणुक केली आहे असे त्यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्ह्याचे शिक्के
बोरसे यांना संशय आल्याने त्यांनी पुरवठा विभागाचे अधिकारी ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता तिघांची भामटेगिरी उघड झाली. त्यानंतर बोरसे यांनी या तिघां भामट्याकडे ओळखपत्राची मागणी केली. मात्र त्यांनी माहिती देणार नाही असे सांगितले आणि नंदुरबार जिल्ह्यातील शिक्के असलेले व इंग्रजी अक्षरात लिहलेली पत्रे दाखविली. आम्हाला संपूर्ण भारतात तपासणी करण्याचा अधिकारी आहे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे बोरसे यांनी उपसरपंच सुधिर बोरसे,ग्रामपंचायत सदस्य संजय देसाई,ऋषीकेश खैरनार यांना बोलावून घेतले. त्यांनी प्रश्‍नांची भडीमार केल्यानंतर तिघां भामट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना घेरुन ठेवले. त्यातील एक भामटा नजर चुकून पळून गेला. दोघांना साक्री पोलिसात नेले. साक्री पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले आहे.बोगस अ‍ॅन्टी करप्शनच्या या भामट्यांनी नंदुरबार जिल्ह्यात अनेकांना गंडा घातल्याची चर्चा सुरु आहे.त्यामुळे पोलिस तपासात पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी केलेले कारनामे समोर येतील असे बोलले जात आहे.

तहसील कार्यालयात विचारणा
या भामट्या अधिकार्‍यांबाबत बोरसे यांना संशय आला. पैसे देतो असे सांगुन त्यांच्याकडून थोडा वेळ मागुन घेतला. त्या वेळात बोरसे यांनी रेशन दुकानदार संघटनेला याप्रकरणाची माहिती दिली. तसेच साक्री तहसील कार्यालयात पुरवठा विभागात याबाबत विचारपूस केली. त्यावेळी आमचे असे कोणतेही अधिकारी तपासणी करत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे अधिकारी बोगस अधिकारी म्हणून सामान्य जनतेची लूट करीत असल्याचे उघडकीस आले.