बोगस अपंग दाखले मिळवून देणार्‍यावर गुन्हा दाखल

0

अमळनेर प्रतिनिधी । बोगस अपंग दाखले मिळवून देणार्‍या अमळनेरच्या एका विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसील कार्यालयात अंध अपंग व्यक्तींना शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेतून ६०० रुपये दरमहा मानधन मिळवण्यासाठी येथील काही नागरिकांनी अपंगांचे दाखले जोडून प्रस्ताव दाखल केले होते. मात्र तहसील विभागाने दाखल्याची ऑनलाईन पडताळणी केली असता आयडी नंबर इज नॉट एक्झिट असा संदेश मिळाल्याने अपंगांच्या दाखल्यांच्या प्रती जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पडताळणीसाठी पाठवले असता अपंग दाखले खोटे असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी तहसीलदारांना पत्र पाठवले त्यामुळे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी लाभार्थ्यांना ६ ऑगस्ट रोजी हजर राहण्याच्या नोटीस देऊन खुलासा मागवले असता त्यांनी हे दाखले आम्हाला दिलीप मोतीराम कासार यांच्याकडून प्राप्त झाले असे लेखी दिल्याने तहसीलदारांनी संजय गांधींचे नायब तहसीलदार राजेंद्र रामदास ढोले यांना पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ढोले यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला दिलीप कासार यांच्या विरुद्ध भादवी ४१८, ४६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.