मुक्ताईनगर। येथील सरपंच व ग्रामविकास अधिकारी मनमानी कारभार करीत असून कुणालाही विश्वासात न घेता कर्मचार्यांची भरती करण्यात आली असून याची चौकशी करण्याची मागणी वार्ड क्रमांक 4 मधील ग्रामपंचायत सदस्य आलमशाह अहमदशाह फकरी यांनी गटविकास अधिकार्यांकडे केली आहे. यासंदर्भात शाह यांनी शनिवार 15 रोजी गटविकास अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
15 ते 17 कर्मचारी भरती बोगस
येथील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकार्यांनी कोणालाही विश्वासात न घेता 15 ते 17 कर्मचार्यांची भरती करण्यात आली आहे. याप्रकरणी कोणतीही शासकीय शासकीय प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. सरपंच व ग्रामविकास अधिकारी कार्यालयात न येता कर्मचार्यांना बाहेर बोलावून कागदपत्रांवर स्वाक्षर्या करतात. ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी हजर न राहता बाहेर गावाहून ये- जा करतात. तसेच वार्डाच्या विकास कामासाठी मागणी केली असता उडवा उडवीची उत्तरे देतात याविषयी वारंवार तक्रार केल्या आहेत. याप्रकरणी शनिवार 15 रोजी झालेल्या बैठकीत आलमशहा यांनी विचारणा केली असता खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचे शहा यांनी म्हटले आहे.
त्यामुळे सरपंच व ग्रामविकास अधिकार्याची चौकशी करण्यात येण्याची मागणी शाह यांनी केली आहे.गावातील नागरिकांकडून याचा विरोध होत आहे. संबंधीत प्रकरणाची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.