मुंबई । गृहकर्जाच्या नावाने एका खासगी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या सात जणांनी कट रचून बँकेत गृहकर्जासाठी बोगस कागदपत्रे सादर करुन ही फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. आरोपींची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. सातही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. अबुजर मोहम्मद रिझवी हे वांद्रे परिसरात राहत असून सध्या ते बॉम्बे मर्कटाईल सहकारी बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. यामुळे गृहकर्जासाठी उपलब्ध करण्यात येत असलेल्या कागदपत्रांबाबत खातरजमा करण्यात आता अनिवार्य बनले आहे.
असे आहे प्रकरण
1 काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे आरोपी गृहकर्जासाठी आले होते. या अर्जासोबत त्याने विजय प्रॉपर्टीजमधील ‘प्राईड’ या इमारतीमध्ये दोन फ्लॅट खरेदी केल्याची कागदपत्रे जोडली होती. या दोन्ही फ्लॅटचे बोगस ऍग्रीमेंट तसेच इतर कागदपत्रे सादर करुन त्याने बँकेकडून 34 लाख 65 हजार रुपयांचे गृहकर्ज मिळविला होते. याकामी या आरोपींना इतर काही आरोपींनी मदत केली होती. कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर त्यांना ते कर्ज मंजूर झाले होते.
2 कर्जाची रक्कम नंतर विविध खात्यात जमा करुन ती रक्कम बँकेसह एटीएममधून काढण्यात आली. सुरुवातीला आरोपींनी काही हप्ते भरले, मात्र नंतर कर्जाचे हप्ते येणे बंद झाल्यानंतर अबुजर मोहम्मद रिझवी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी बँकेच्यावतीने सांताक्रूझ पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आता सातही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.