बोगस कागदपत्राद्वारे मिळवले कंत्राट

0

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सातही वॉर्डांमध्ये पथदिव्यांसाठी एलईडी दिव्यांचा वापर सुरू केला आहे. त्यानुसार यावर्षीच्या अधिकृत पुरवठादारांकडून एलईडी पुरवठ्यासाठी निविदा मागविल्या होत्या. त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन एका ठेकेदाराला ठेका दिला असून, हा ठेकेदार अधिकृत पुरवठादार नसल्याचा आक्षेप दुसर्‍या क्रमांकाच्या ठेकदाराने घेतला आहे. त्यामुळे आता त्याचा खरेपणा तपासण्याची वेळ कॅन्टोन्मेंट बोर्डावर आली असून, पुरवठा मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सातही वॉर्डात एलईडी दिवे लावण्यात येत आहेत. यावर्षी तीन गटात विभागून हे कंत्राट देण्यात आले. त्यासाठी नियमानुसार निविदा प्रक्रिया झाली. तीनही गटात सर्वात कमी बोली लावणार्‍या हरिओम इंजिनियरींग या ठेकेदाराला हे कंत्राट निश्‍चित झाले. मात्र, दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या एस. एम. सेल्स कार्पोरेशन या ठेकेदार संस्थेने त्यावर हरकत घेतली आहे. हरिओम या संस्थेने सादर केलेले बजाज इलेक्ट्रीकल्सचे अधिकृत वितरक असल्याचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप या ठेकेदाराने केला आहे. हा आक्षेप खरा ठरविण्यासाठी संबंधित हरिओम हि संस्था अधिकृत वितरक नसल्याचे त्याच कंपनीचे पत्र त्याने सादर केले आहे. त्यामुळे बोर्डासमोर निर्माण झाला आहे.

यासंदर्भात आता संबंधित कंपनीच्या विविध कार्यालयांशी संपर्क साधण्यात येणार असून संबंधित ठेकेदार अधिकृत वितरक असल्याची खात्री करण्यात येणार आहे. या कार्यवाहीत बराच वेळ जाणार असल्यामुळे देहूरोडकरांना आणखी काही दिवस एलईडी दिव्यांची वाट बघावी लागणार आहे.