पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत 18 नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत 22 नगरसेवक आणि पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 15 च्यावर सदस्य हे कुणबी जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून निवडून आलेले आहेत. त्यामुळे मूळ इतर मागासवर्गीयांवर (ओबीसी) अन्याय झाला असून, त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. त्यामुळे अशा सर्व बोगस ओबीसींच्या कागदपत्रांची कसून चौकशी करण्यात यावी, व त्यांचे बोगस जातप्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. यासह कुणबी समाज संघ व ओबीसी सेवा संघाच्यावतीनेही याप्रश्नी जोरदार आवाज उठविण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे हे कुणबी जातीचे नाहीत, त्यांचा आमच्या समाजाशी कुठलाही संबंध नाही, त्यांच्या कुटुंबीयांशी आमचे रोटी-बेटी व्यवहार नाहीत, अशी माहिती देऊन आमच्या नावावर काळजे हे राजकारण करत आहेत. त्यांच्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोपही कुणबी समाज संघाने केला.
नितीन काळजेंनी कुणबीच्या नावावर राजकारण करू नये : कुणबी समाज संघ
उच्चवर्णीय मराठे असतानाही बोगस कुणबी प्रमाणपत्र मिळवून राजकारणात उच्चपदे लाटणार्या लोकप्रतिनिधींविरोधात कुणबी व ओबीसी समाजाच्या संघटनांनी तीव्र आवाज उठवत सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रकेच त्यांनी प्रसिद्धीस दिली. कुणबी समाज संघ, पुणेच्यावतीने दिलेल्या पत्रात नमूद आहे, की पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे हे कुणबी नाहीत. फक्त राजकीय किंवा अन्य लाभ घेण्यासाठी ही मंडळी कुणबी असल्याचा दावा करत आहेत. इतर वेळेस मराठा, देशमुख, पाटील, 96 कुळी म्हणून ही मंडळी मिरवतात. फक्त अन्य मागासवर्गीयांच्या राखीव असलेल्या जागेवर यांना फायदा घेणे हा एकमेव उद्देश असतो. खरे कुणबी अत्यल्प भूधारक असून, भूमिहीन शेतमजूर असतात. आमच्या माहितीप्रमाणे काळजे हे 96 कुळी मराठा असून, नामांकित आणि श्रीमंत परिवारातून आहेत. तेव्हा काळजे यांनी कुणबीच्या नावावर राजकारण करू नये, त्यामुळे आमच्या भावना दुखविल्या जात आहेत, असेही कुणबी समाजाच्यावतीने काळजे यांना ठणकावण्यात आले आहे.
पीसीएमसीत मूळ ओबीसीलाच संधी द्या : समता परिषद
निवडून आलेल्या महापालिका, जिल्हा परिषद सदस्यांच्या कुणबी जातप्रमाणपत्रांची कसून चौकशी करण्यात यावी, बोगस कुणबींचे जातप्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये खर्या ओबीसीलाच संधी देण्यात यावी, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची भेट घेऊन निवेदन देणार असून, मूळ ओबीसींवरील अन्याय दूर झाला नाही तर सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा समता परिषदेच्यावतीने देण्यात आला आहे.
बोगस दाखले देणार्या-घेणार्यांवर कारवाई करा!
पिंपरी-चिंचवडमध्ये ओबीसीसाठी राखीव असलेल्या महापौरपदी ओबीसी असल्याचे भासवून, खर्या ओबीसींना डावलून अन्याय करण्याचे काम सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे. भाजपला पुढच्या निवडणुकीत ओबीसींची मते नको आहेत का? असा सवाल ओबीसी सेवा संघाच्यावतीने विचारण्यात आला. आई मराठा, बाप मराठा असे शाळेतील दाखल्यावर लिहिलेले असताना मुलाला कुणबी असा दाखला कसा दिला जातो याचे समाधानकारक उत्तर संबंधित अधिकार्यांनी द्यावे. मराठा असतानाही बोगस कुणबी दाखला देणार्या आणि घेणार्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी ओबीसी सेवा संघाच्यावतीने करण्यात आली आहे.