बोगस कृषी विद्यापीठामुळे विद्यार्थी आले अडचणीत

0

पुणे । राज्यात सुरू असलेल्या कृषी सेवक भरती प्रक्रियेत बोगस विद्यापीठाची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. औरंगाबाद विभागातील लेखी परीक्षेनंतर यातील एका विद्यार्थ्याकडील या विद्यापीठाच्या पदवीमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत विभागीय कृषी सहसंचालकांनी महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून माहिती मागविली आहे. हे विद्यापीठ बोगस असल्याचे परिषदेने जाहीर केले आहे.

सहसंचालकांनी मागविली माहिती
राज्यात सध्या कृषी सेवक भरती प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबाद विभागातील भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा पार पडली असून पात्र उमेदवारांची निवडही करण्यात आली आहे. या निवडप्रक्रियेमध्ये एका विद्यार्थ्याने सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असलेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठाची पदविका घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी विभागीय कृशी सहसंचालकांनी संबंधित विद्यापीठाला मान्यतेबाबत विचारणा केली होती. त्यावर विद्यापीठाने या पदविकेला मान्यता मिळाल्याचे कळविले. तशी कागदपत्रेही सादर केली आहे. मात्र, याबाबत साशंकता निर्माण झाल्याने सहसंचालकांनी कृषी परिषदेकडे प्रस्ताव पाठवून या विद्यापीठाबाबत माहिती मागविली आहे.

राज्यात चारच कृषी विद्यापीठे अधिकृत
याविषयी माहिती देताना परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले, महाराष्ट्र कृषी विद्यापीठे 1983 या कायद्यानुसार राज्यात केवळ चारच कृषी विद्यापीठे अधिकृत आहेत. या विद्यापीठांव्यतिरिक्त कृषी अभ्यासक्रम राबविण्यास इतर कोणत्याही विद्यापीठाला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठ हे अनधिकृत आहे. या विद्यापीठात राज्यात ठिकठिकाणी विविध विद्यालयेही आहेत. त्याना कृषी परिषद किंवा चारही विद्यापीठांनी मान्यता दिलेली नाही. त्यामुळे ही विद्यालये आणि त्यांनी दिलेली पदवीही अनधिकृत ठरते.