चोपडा । बोगस खरेदीखत करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लताबाई सुरेश पाटील यांनी शहरातील पाटील गढीतील सिसन 4177 हे घर भाड्याने घेवून त्या 2005 सालापासून तिथे राहतात. यानंतर 2012 साली हे घर मी विकत केले असून याचे भाडे मला द्यावे असे सुरेश रामराव पाटील यांनी लताबाई यांना सूचविले होते.
लताबाई ह्या नियमीतपणे सुरेश पाटील यांना रोखीने अथवा मनी ऑर्डरने घरभाडे देत होत्या. मात्र, 2014 साली सुरेश पाटील यांनी लताबाई यांना घर विक्री काढले असून ते तुम्ही विकत घ्या अशी गळ घातली. यावर लताबाई यांनी बँकेचे कर्ज मिळाल्यावर खरेदी करण्याच्या अटीवर घराचा सौंदा साडेसात लाखात केला. त्याची सौदापावती म्हणून 1 लाख रूपयांचे बेणे सुरेश पाटील यांना लताबाई यांनी दिले. दरम्यान, घर खरेदीपूर्वी घर सुरेश पाटील यांचे नसून ते बाबुराव श्रीपत पाटील यांचे असल्याचे व ते 1992 साली मयत झाल्याचे कळाले. यानंतर लताबाई यांनी सुरेश पाटील यांच्याकडून बेणे दिलेले 1 लाख रूपयांची मागणी केली असता सुरेश पाटील व साक्षीदार यांनी त्यास नकार दिला. यावेळी लताबाई यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यातच सुरेश पाटील याने आपले वडील रामराव श्रीपत पाटील याला घरमालक म्हणून उभे करून बोगस खरेदीखत करून घेतल्याचे समजते. यात संशयित आरोपींनी लताबाई व शासनाची फसवणूक केली म्हणून लताबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला सुरेश रामराव पाटील, रामराव श्रीपत पाटील, प्रभाकर जगन्नाथ शिंपी सर्व रा. चोपडा, बारकू निळकंठ पाटील रा. लासूर यांचे विरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिआय नजम पाटील, सपोनी सुजित ठाकूर करीत आहेत.