बोगस डॉक्टरांंविरुध्द पोलिसांनी कारवाई करावी

0

शिरपूर। आठवडे बाजाराच्या दिवशी रस्त्यावर पथारी टाकून कोणतेही प्रमाणपत्र नसताना बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांविरुध्द पोलिस विभागाने तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज बोगस वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंधक बैठक जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.

आरोग्य खाते, पोलिसांसह बैठक
यावेळी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, तालुका आरोग्याधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील, डॉ. जी. डी. पाटील, डॉ. चंद्रशेखर डांगे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त आर. पी. थेटे, डॉ. एम. आर. शेख, पोलिस निरीक्षक डी. एम. गवळी, डॉ. महेश मोरे, डॉ. योगेश सर्यवंशी, डॉ. चंद्रकांत येशीराव उपस्थित होते.

कारवाईचा आढावा
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, बोगस डॉक्टर आठवडे बाजारात रुग्णांची तपासणी करीत असेल, तर हा धोकादायक प्रकार आहे. पोलिसांनी तपास करुन अशा बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त करावा. बोगस डॉक्टरांचा विषय यंत्रणांनी गांभीर्याने घ्यावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी दिले. बैठकीत मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, मागील सभेतील ठरावांवर केलेल्या कार्यवाहीची चर्चा करणे, जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरुध्द झालेल्या तक्रारी संदर्भात केलेल्या कारवाईचा जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी आढावा घेतला.