भुसावळ। औष्णिक विज निर्मिती केंद्र (दीपनगर) येथील बोगस नोकर भरती प्रकरणी अटकेत असलेला योगेश पाटील यास मंगळवार 9 रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता 15 मे पर्यंत पुन्हा सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दीपनगर येथे बोगस नोकर भरती प्रकरणी दीपनगर प्रशासनातर्फे 10 संशयीतांविरुध्द तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
1 लाख 14 हजारांची रक्कम ताब्यात
याप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून दीपनगर येथील कर्मचारी (लिपीक) योगेश पाटील यास अटक करण्यात आली होती. आज 9 रोजी त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायाधीश एम.एम.बारवे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीसांनी त्याच्याकडून बोगस नोकर भरती प्रकरणी वापरण्यात आलेले शिक्के तसेच उमेदवारांकडून घेतलेली रक्कम याची माहिती मिळण्यासाठी त्याची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. आरोपीतर्फे अॅड. मनिष सेवलानी यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅड. संतोष कलंत्री यांनी कामकाज पाहिले.
संशयीत आरोपी पाटील याच्याकडे नोकर भरती प्रकरणी उमेदवारांकडून 92 लाख 50 हजार रुपये घेतले असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने या पैशातून 12 लाख रुपयांची मारुती सियाज हे वाहन खरेदी केल्याचे समजते. हि गाडी पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. तसेच त्याच्या घरुन 1 लाख 14 हजार 800 रुपयांची रक्कम ताब्यात घेतली आहे. अजून त्याच्याकडून नोकर भरती प्रकरणी वापरण्यात आलेले साहित्य व रक्कमेची माहिती मिळण्यासाठी त्याची पोलीस कोठडी मिळण्याची मागणी न्यायालयासमोर पोलीस निरीक्षक बाळासाहेब गायधनी यांनी केली. तपासात पाटील याने अजून 12 मुलांना नोकरीस लावून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी तालुका पोलीसात दीपनगर प्रशासनातर्फे गुन्हा दाखल होणार असल्याचेही पोलीसांनी सांगितले. दरम्यान दीपनगर येथे झालेल्या बोगस नोकर भरती प्रकरणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे अध्यक्ष अरुण दामोदर यांनी सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे.