बोगस बियाणे देणार्‍या कंपनीवर कारवाईची मागणी

0

चाळीसगाव : खरीप हंगाम 2017मध्ये तालुक्यातील अनेक ठिकाणी कापुस पिकांवर मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आले. यात कपाशीचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करुन पंचनामे करावेत व बोगस बीटी कापुस उत्पादन करणार्‍या कंपनीवर कारवाई करावी तसेच नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी अन्नदाता शेतीसेवा बहुउद्देशीय शेतकरी गटातर्फे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन तहसिलदार यांच्याकडे नाना पाटील यांच्यासह शेतकर्‍यांनी दिली. चालु हंगामात राज्यात लागवड केलेल्या बीटी कापुस पिकांवर बोंड अळीचा प्रादुभाव वाढून 70 टक्के कापुस पिकाचे नुकसान झाले आहे.

बोंडअळीचा प्रादुर्भाव
पाऊस कमी असतांनाही बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्‍यांना अधिक फटका बसला आहे. उत्पादन खर्चही निघालेले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यशासनाने कापुस पिकाची पाहणी करुन पंचनामे करावे, बोगस बीटी कापुस बियाणे उत्पादन करणार्‍या कंपनीवर कारवाई करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच पंतप्रधान पिक विमा योजने अतर्गंत ज्या शेतकर्‍यांनी पिक विमा काढला होता तो मंजुर करुन त्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती आमदार, तालुका कृर्षी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.