मुंबई:- राज्यात अनेक ठिकाणी खरीप हंगामात पेरणी केलेले शेतकरी वेळेवर पाऊस न आल्याने संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. यातच बळीराजाच्या संकटात भर म्हणून काही ठिकाणी शेतकऱ्यांना महाबीजकडून दिलेली बियाणे बोगस निघाले असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांना दिलेली बियाणे बोगस आढळल्यास शासनाकडून त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेल असे राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले. याबाबत पंचनामा करण्याचे निर्देश दिले असून या प्रक्रियेत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही कृषिमंत्र्यांनी दिली.
पंचनामे करण्याचे निर्देश
ज्या तालुक्यातल्या तक्रार निवारण केंद्रात यासंदर्भातल्या तक्रारी आल्या आहेत. त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांना आणि महसूल अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांच्या अहवालात जर शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचे स्पष्ट झाल्यास त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, असे कृषिमंत्री फुंडकर यांनी सांगितले. दरम्यान बियाणे पेरल्यानंतर ते का उगवले नाही? त्याची दुसरी काही कारणे आहेत का? याची पडताळणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
वारंवार बाजारात येतेय बोगस बियाणे
एकीकडे राज्यातल्या काही भागात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्या पेरणीचे बीज बोगस निघाल्याने राज्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. आस्मानी आणि सुलतानी संकटांनी घेरले असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या खरिप हंगामाची जोरदार तयारी सुरू असून शेतकरी मशागत व बियाणे खरेदीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र याचा फायदा घेत काही व्यापारी व दलालांनी अनाधिकृतपणे कृषी विभागाकडून कसलीही मान्यता नसताना सर्रास शेतकऱ्यांना तेलंगणा, आंधप्रदेश, गुजरात राज्यातील बोगस बियाणे दुप्पट किंमतीने विकत असल्याचा प्रकार सीमावर्ती भागात सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याआधीही या प्रकारच्या घटना विदर्भ आणि मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील समोर आल्या आहेत. तरीही या प्रकारावर अंकुश येत नसल्याचे चित्र आहे. याबाबत कृषिमंत्र्यांना विचारले असतात त्यांनी राज्यातल्या गुणवत्ता नियंत्रण विभागाला सूचना देण्यात आल्या असून संबंधित कंपन्यांच्या बियाणांची तपासणी सुरु असून या कंपन्यांची बियाणे बोगस आढळल्यास त्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
बोगस बियाणे असल्याच्या काही तक्रारी आल्या असून यासंबंधी पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांना असे बियाणे मिळालेत त्यांना नुकसान भरपाई देणार आहोत. तसेच दोषींवर देखील कारवाई केली जाईल.
पांडुरंग फुंडकर
कृषिमंत्री