जळगाव । राशी 659 या कापूस बियाण्याला सर्वाधिक मागणी होती. मात्र यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान राशी आरसीएच 659 बीजी-2 या नावाचे 2 लाख 24 हजार 800 रुपये किमतीचे बोगस बियाणे विक्रेत्याला मंगळवारी 30 रोजी चोपडा येथे अटक करण्यात आले होते. बोगस कापूस बियाणे विक्रेता हा शिरपूर तालुक्यातील मांजरोध येथील आहे. यासंबंधी चोपडा पोलीस स्टेशन येथे सकाळी 5 वाजता गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणी कृषी मोहीम अधिकार प्रदीप ठाकरे यांनी फिर्याद दिली होती. राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे. चोपडा तालुक्यातील एका शेतकर्यांने राशी आरसीएच 659 बीजी-2 हे बोगस बियाणे खरेदी केले होते. पेरणी केल्यानंतर ही वाण बोगस असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखा व जि.प. कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनी सापळा रचुन विक्रेत्याला अटक केली.
बोगस बियाणे कसे ओळखावे: बियाण्याच्या पाकिटामध्ये येणार्या 120 गॅ्रम पाकिटासोबत मोहिती पत्रक येते, या माहिती पत्रकावर मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या चार भाषेत सुचना लिहलेली असते. बोगस बियाण्याच्या पाकिटात माहिती पत्रक नसते. बारकोड सोबत कस्टमर नंबर नसतो, साजुक बियाणे पाकिटावर प्रोड्युस असे लिहलेले असते तर बोगस बियाणे पाकिटावर मॅन्युफॅक्चर असे लिहलेले असते. बोगस बियाणे पाकिटावरील चांदीच्या रंगातील पट्टी निघते आदी खुणांवरुन बोगस पाकिटे ओळखता येते.
कृषी अधिकार्यांचे आवाहन : राशी 659 या कापूस बियाण्याच्या वाणाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी होती. मात्र जालना जिल्ह्यात या बियाण्यावर मोठ्या प्रमाणात अळी आढळुन आल्याने या बियाण्यावर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. बोगस बियाण्यापासून सावधान रहावे तसेच जर चुकीने बोगस बियाणे लागवड झाल्यास पाच दिवसात उगवले नसल्यास दुबार पेरणी करावी, बोगस बियाणे असल्याची शंका असल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनी केले आहे.