बोगस बियाण्यांमुळे कापसाचे पीक गेले वाया

0

एरंडोल। कापसाची लागवड करून सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी होऊन देखील पिकाची अपेक्षित असलेली वाढ होत नसल्यामुळे तसेच वाढलेली कपाशी लाल पडून जळत असल्यामुळे सदरचे पिक उपटुन फेकण्याची वेळ पिंप्री बुद्रुक ता.एरंडोल येथील दोन शेतकर्‍यांवर आली आहे.संबंधित बियाणे कंपनी व कृषी खात्याने याचे खापर हवामानावर फोडुन स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या दोन्ही शेतकर्‍यांच्या शेतात लावलेली कपाशी चांगल्या पद्धतीने व कंपनीच्या सुचनेनुसार मशागत केली होती. त्यांच्या नियमानुसार मशागत करून एका शेतकर्‍याच्या शेतात ठिबक असूनही पिकांची प्रत पुर्णपणे ढासाळली आहे.या बाबत कृषी विभागाने अहवाल पोस्टाद्वारे संबंधित शेतकर्‍यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

कंपनीच्या नियमानुसार शेतीची मशागत करून कपाशीचे नुकसान
पिंप्री बु.ता.एरंडोल येथील शेतकरी भाऊसाहेब मगन पाटील यांनी एरंडोल येथील पांडव कृषी केंद्रावरून 21 मे 2017 रोजी ‘फर्स्ट क्लास बायर’ कंपनीच्या कपाशी बियाण्याच्या दोन पिशव्या विकत घेऊन आपल्या गट क्रमांक 100/2 असलेल्या शेतात लावल्या. त्यानंतर जवळपास 25 दिवसानंतर आपली लावलेली कपाशी बाजूला असलेल्या शेतकर्‍याच्या कपाशी सारखी आपल्या पिकाची वाढ होत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संबंधित बियाणे विक्रेते व बियाने कंपनीस संपर्क साधुन सदरील बाब लक्षात आणुन दिली.कंपनी व दुकानदार यांनी त्यांच्या शेतावर जाऊन भाऊसाहेब पाटील यांना सदर पिकास खाते व फवारणी करण्याचे सांगितले.

पंधरा दिवस उलटूनही पिकावर कोठलाही चांगला परिणाम ना होता उलट पिक लाल होऊन जळू लागले. त्यानंतर पाटील यांनी एरंडोल कृषी विभागाकडे आपली फसवणुक झाल्याची तक्रार केली. अशाच प्रकारे पिंप्री बु.येथील शेतकरी बापु साहेबराव पाटील यांनीही आपल्या शेतात गट नंबर 20/1 याच कंपनीचे व याच कृषी केंद्रावरून घेतलेले कपाशीचे बियाणे लावले होते. त्यांच्याही शेतात कपाशीची वाढ खुंटली असल्याची बापु पाटील यांनीही 17 जुलै 2017 रोजी तक्रार केली व एरंडोल कृषी विभागाने त्वरित दखल घेऊन 18 जुलै व 28 जुलै 2017 रोजी एरंडोल कृषी विभागासह जिल्ह्यावरील कृषी विभागासोबत भाऊसाहेब पाटील व बापु पाटील यांच्या शेतावर त्यांना न बोलवताच भेट देऊन परत पाहणी केली. तसेच अहवाल लवकरच तुम्हाला पोस्टाद्वारे कळविण्यात येईल असे सांगितले.

कृषी विभागाच्या अहवालावर शंका
याप्रमाणे अहवाल प्राप्त झाला व त्यात कृषी विभागाकडून हवामानातील विपरीत घटक, व्यवस्थापनाची कमतरता, मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे म्हटले आहे. परंतु वरील दोघंही शेतकर्‍यांना हा अहवाल मान्य नसुन त्यांनी याबाबत जर हवामानावरील विपरीत परिणाम हा आमच्याच शेतावरील पिकांवरच कसा झाला ? भाऊसाहेब पाटील यांच्या विहिरीला भरपुर पाणी असून सोबत पाणी देण्यास ठीबकही केले आहे. तसेच त्यांनी वारंवार कंपनीच्या सुचनेप्रमाणे मशागत केली आहे. तरीही अहवालात व्यवस्थापनाची कमतरता दाखवण्यात आली आहे. यामुळे भाऊसाहेब पाटील व बापु पाटील यांनी कृषी विभागाच्या अहवालावर शंका व्यक्त केलेली असुन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन न्याय मिळण्याची मागणी केली आहे. ऑगस्ट महिना संपत आल्याने आणि पावसाने दडी मारल्याने शेतात कोणतीही लागवड करता येणार नाही त्यामुळे हे शेतकरी अधिकच संकटात सापडले आहे.