डॉ.धनराज माने यांची माहिती; नियमबाह्य पदव्यांबाबत तक्रार करण्याचे आवाहन
पुणे : राज्यातील नियमबाह्य पदव्या देणार्या शैक्षणिक संस्था आणि बोगस विद्यापीठांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार आहे. यामध्ये कोणालाही पाठीशी घालणार नसून ज्यांच्या तक्रारी प्राप्त आहेत. त्यांच्यावरील कारवाईला सुरुवात करणार आहे. ज्यांना नियमबाह्य पदव्या दिल्या गेल्या आहेत. त्यांनी उच्च शिक्षण संचालनालयात येऊन तक्रार द्यावी अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.धनराज माने यांनी दिली आहे. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डॉ. माने म्हणाले, महाराष्ट्र कृषी, पशु, मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च तंत्रज्ञान व व्यवसाय शिक्षण यांमधील अनधिकृत संस्था व अभ्यास पाठ्यक्रम अधिनियम 2013च्या प्रयोजनार्थ दि.7 नोव्हेंबर 2013ला अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण यांमधील शिक्षण संस्था व अभ्यासक्रम यासाठी संचालक तसेच तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक यांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित केले. त्यामुळे त्यांना कारवाई करण्याचे थेट अधिकार मिळाले आहेत.
पूर्वी असे अधिकार नसल्यामुळे कारवाई करण्यास मर्यादा येत होत्या. आता मात्र कोणाचीही गय केली जाणार नाही. बोगस विद्यापीठे आणि नियमबाह्य पदव्या देणार्या शैक्षणिक संस्थाच्या 40पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित संस्थांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.
पोलीस प्रशासनाची मदत घेणार
दोन-तीन वेळा संधी देऊनही जर कोणी उपस्थित राहिले नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे. ज्यांना नियमबाह्य पदवी किंवा बोगस विद्यापीठाची डिग्री देण्यात आली आहे त्यांनी उच्च शिक्षण संचालनालयात येऊन तक्रार देण्याचे आवाहन देखील डॉ. माने यांनी केले आहे.