बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर तात्काळ कारवाई करणार

0

धुळे । जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर तत्काळ कारवाई करुन तालुका आरोग्य अधिकारी यांनी पुढील बैठकीत अहवाल सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी व प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी असलेल्या जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची मासिक बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. वाय. पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. योगेश सूर्यवंशी, जिल्हा आयुर्वेद विस्तार अधिकारी डॉ. एस. व्ही. मुरमुरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, समाजात बोगस वैद्यकीय व्यावसायिक असणे वाईटच आहे. त्यांना हटविणे ही शासकीय यंत्रणेची जबाबदारी आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेने कोणतेही कारणे देवू नयेत. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी यांनी पुढील बैठकीपूर्वी काय कारवाई केली याचे सविस्तर अहवाल सादर करावेत. तसेच बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाईसाठी पोलिसांचे सहकार्य घ्यावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी नमूद केले. या बैठकीत जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरुध्द झालेल्या तक्रारी संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी घेतला. डॉ. सूर्यवंशी यांनी बोगस डॉक्टरांच्या यादीबद्दल माहिती दिली.