जुन्नर : 10वी च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी पर्यवेक्षक तुळशिराम सहादु साबळे व केंद्रसंचालक संजय माधव जोशी यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांकडे केली आहे. गटशिक्षण आधिकारी तथा परीक्षेचे कस्टडीयन के.डी. भुजबळ यांनी याबाबत पत्र दिले आहे.
जुन्नरमधील शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालयातील सहशिक्षक होना दादू चिमटे यांनी भुजबळ यांचेकडे तक्रार दिली. या विद्यालयात 1 मार्च रोजी मराठीचा पेपर होता. केंद्रावरील ब्लॉक क्र.23 वर कृष्णराव मुंढे विद्यालयाचे उपशिक्षक तुळशीराम सहादु साबळे हे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. या ब्लॉकमध्ये एकूण 17 विद्यार्थी हजर होते. 5 मार्च रोजी सहशिक्षक होना चिमटे यांनी फॉर्म नं.1 वर 17 विद्यार्थ्यांच्या बोगस सह्या करण्यात आल्याची तक्रार केली होती. भुजबळ यांनी सदर विद्यार्थ्यांच्या सह्यांची खातरजमा केली असता सह्या यात तफावत असल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी संबंधित सहशिक्षक तुळशीदास साबळे यांनी जबाबात सदर प्रकार मान्य केला आहे. केंद्रसंचालक संजय जोशी यांना हा प्रकार माहीत असताना त्यांनी बोगस सह्यांचा फॉर्म न. 1 परीक्षा परीरक्षक यांचेकडे जमा केला. 6 मार्च रोजी या 17 विद्यार्थ्यांचा जबाबावरून तुळशीदास साबळे यांनी सर्व सतरा विद्यार्थ्यांच्या बोगस सह्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तक्रारदार यांचे तक्रारीत तथ्य आढळल्याने सदर उपशिक्षक तुळशीदास साबळे यांचे यापुढील पर्यवेक्षणाचे काम थांबविण्यात आले आहे.