दर्यापूर – अनधिकृतजागी बेकायदेशीर सेंद्रिय खताची विक्री करताना सुमारे कोल्हापूर येथील राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे सुमारे 35 हजार रुपयांचे खत जप्त करण्यात आले. ही कारवाई कृषी विभागाच्या भरारी पथकाने गुरूवारी (दि. 25) सायंकाळच्या सुमारास टाकळी पुर्णा येथे केली. दरम्यान या प्रकरणात किरण उर्फ प्रदिप वानखडे संशयीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
दर्यापूर तालुक्यात बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात विनापरवाना अनधिकृत ठिकाणी सेंद्रिय खतांची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने आज सायंकाळच्या सुमारास टाकळी पुर्णा येथे धाड टाकली असता एमएच 27-एक्स-7207 क्रमांकाच्या मिनी मालवाहू मोटारीतून कोल्हापूर येथील राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे सेंद्रिय खते विकली जात असल्याचे आढळून आले. या खताची सरासरी हजार रुपये प्रति बॅगने विक्री केली जात होती. संबंधित विक्रेत्याने आतापर्यंत पेठ इतबारपूर, पनोरा, टाकळी, आमला, थिलोरी आदी गावांमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात या खतांची विक्री करण्यात आली आहे. शेतकर्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आतापर्यंत चार ते पाच लाख रुपयांच्या खताची विक्री करण्यात आल्याची चर्चा आहे.
दरम्यान या खताच्या खरेदीसाठी शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणात बुकींगही करण्यात आले आहे. परंतु भरारी पथकाच्या धाडीनंतर संबंधित विक्रेत्याकडे कोणताच परवाना नसल्याचे आढळून आले. दरम्यान भरारी पथकाच्या कारवाई नंतर वाहनाचा चालक पळून जाण्यात यशस्वी झाली. पथकाने रात्री उशीरा संबंधित वाहन खतासह दर्यापूर पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.