रॅकेटचा होणार उलगडा ; यावल पोलिसांची कामगिरी
यावल:- बोगस सॉल्व्हन्सी प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या अकोल्याच्या दोघा आरोपींची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या प्रकरणात एका वेंडरसह दलालाला अकोल्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
न्यायालयाला शंका आल्याने बिंग फुटले
यावल येथे बाबा नगरातील घरफोडीतील आरोपी अटकेत असून त्यांना जामीन मिळावा म्हणून यावल न्यायालयात आरोपींतर्फे अर्ज करण्यात आला होता. त्यात न्यायालयाने या आरोपींना सॉल्व्हन्सी मागितली होती त्याच अनुषंगाने अकोला येथील अविनाश समाधान वाकोडे व संतोष गंगाराम कोथळकर (जुन्या ग्रामपंचायतीजवळ, अकोला ) यांनी 28 मार्च 18 रोजी सॉल्व्हन्सी तयार करून आरोपींना जामीन होण्यासाठी आल्यानंतर न्यायालयाचे न्या.डी.जी.जगताप यांनी नेटवरून सॉल्व्हन्सीची कागदपत्रके तपासली असता त्यांना संशय आला. गट नंबर दुसर्याच्या नावे व शिक्के बोगस व सह्यांमध्ये तफावत असल्याची शंका आल्यानंतर साहेबराव चिंधु पाटील यांना दोघा बोगस सॉल्व्हन्सी धारकांसह जामिनदारांना पोलिसांना ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर आरोपींविरुद्ध न्यायालयाची दिशाभूलप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली होती तर गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
अकोल्यातील दलालासह वेंडर जाळ्यात
पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या र्मादर्शनाखाली फौजदार अशोक अहिरे हेड, कॉन्स्टेबल संजीव चौधरी, गोरख पाटील, राजेश महाजन, सतीष भोई यांनी अकोला येथील तहसील कार्यालय साध्या वेशात गाठले. कॉन्स्टेबल सतीष भोई यांनी या बोगस सॉल्व्हन्सी बनवून देणार्या टोळीतील दलाल शे.आजम शे.हसन यास गाठले. शेतकरी वेशात व डोक्याला उपरणे लावून आलेल्या भोई यांनी आपल्याला सॉल्व्हन्सी हवी असल्याचे सांगताच शे.आजमने वेंडर राहुल इंगळे मामा तुमचे काम करून देईल, असे सांगत असतानाच संशयीत तेथे आले. भोई यांनी राहुल मामा तुम्हीच का असे सांगताच त्यांनी होकार दिल्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी अविनाश वाकोडे व संतोष कोथळकर यांना सॉल्व्हन्सी तयार करून दिल्याचे कबुल केले. तहसीलदारांचे बोगस तयार केलेले शिक्के ताब्यात घेण्यात आले तर खातरजमा नंतर ते बोगस असल्याचे चित्र झाले.
वेंडरच्या अधिकृततेबाबत संभ्रम
अटकेतील वेंडर हा अधिकृत आहे वा नाही याची खातरजमा करण्यासाठी यावल पोलिसांनी दुय्यम निबंधक कार्यालयात पडताळणीबाबत अर्ज दिला आहे. दरम्यान, या टोळीने या आधीही बोगस उतारे व सॉल्व्हन्सी कुणाला व कोणत्या प्रकरणात दिली याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.