बोट उलटून 19 जणांना जलसमाधी

0

युपीतील बागपत जिल्ह्यातील यमुना नदीतील दुर्घटना

बागपत : उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील काठा गावात गुरुवारी सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास यमुना नदीत बोट उलटल्याने 19 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. बोटीत 60 पेक्षा जास्त प्रवासी होते. मृतांमध्ये बहुतांश मजुरांचा समोवेश आहे. ते मजुरीसाठी बागपतहून हरियाणाला जात होते. वेळेत मदत न पोहोचल्याने संतापलेल्या नागरिकांनी दिल्ली-यमनोत्री हायवेवर रास्तारोको करत वाहनांची तोडफोड केली. एक ट्रक पेटवून दिला. घटनास्थळी पोहोचलेल्या जिल्हाधिकार्‍यांना नागरिकांनी घेराव घातला.

मृतांच्या वारसाला 2 लाख रुपये
बागपतचे जिल्हाधिकारी भवानी सिंह खंगारोत यांनी सांगितले की, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसले होते. त्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे. पोलिस प्रशासन आणि स्थानिकांनी मदत आणि बचावकार्य सुरु केले असून, एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. बचावपथकाने आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढले आहेत. इतरांचा शोध सुरु आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बागपत येथील दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या वारसाला 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.