सत्ताधारी, विरोधकांच्या बैठकीत निर्णय ; विहिरींतील गाळ काढणार
बोदवड- शहराला ऐन पावसाळ्यातही टंचाईचे चटके जाणवत असल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मंगळवारी सत्ताधारी व विरोधकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. नगराध्यक्षा मुमताजबी सईद बागवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत जुनोना येथून बोदवड शहरासाठी पाणीपुरवठा करण्याचे ठरले तर शहरातील पाणी असलेल्या विहिरींचा गाळ काढण्याचे आदेश देण्यात आले. प्रभु अँग्रो कंपनीतील विहिरीमध्ये इलेक्ट्रीक मोटार टाकुन शहरात पाणीपुरवठा टँकरने करण्याबाबत तसेच ज्या विहिरींना पाणी आहे त्यांना अधिग्रहीत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिवाय जिल्हाधिकारी यांच्याकडे टँकर व नवीन बोअरवेल करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी दिली.
पावसाळ्यात पाण्यासाठी हाल
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी विरोधी नगरसेवक दीपक झांबड यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे. शहरातील बोअरवेसह विहिरी कोरड्याठाक पडल्या आहे तर नदीपात्र कोरडेठाक झाल्याने ओडीएचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाणीटंचाईचे संकट पाहता बोदवड शहरात नागरीकांना खाजगी टँकरने एक हजार रुपये मोजून पाच हजार लिटरचा टँकर व तीनशे रुपयात एक हजार लिटरची टाकी मिळत आहे व थंड पाण्यासाठी 30 रुपयांप्रमाणे जार खरेदी करावा लागत आहे.
यांची टंचाई बैठकीला उपस्थिती
नगराध्यक्ष मुमताजबी बागवान, उपनगराध्यक्ष दिनेश माळी, विरोधी गटनेता देवेंद्र खेवलकर, नितीन चव्हाण, सुनील बोरसे, दीपक झांबड यांची होती उपस्थिती. आनंदा पाटील, विजय पालवे, सलीम कुरेशी, धनराज गंगतीरे हे चार नगरसेवक प्रतिनिधी तसेच मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, अभियंता अमित कोलते व पाणीपुरवठा कर्मचारी गोपाल खेवलकर उपस्थित होते.