बोदवडकरांना सॅल्यूट : सोशल डिस्टन्स ठेवून व्यवहाराला प्राधान्य

0

बोदवड : गेल्या दोन दिवसांपासून संचारबंदी व जमावबंदी आदेश हलक्यात घेणार्‍या बोदवडकरांना कोरोना गांभीर्य कळाल्यानंतर व प्रशासनाने कोरोनाबाबत प्रभावी जनजागृती केल्यानंतर शहरातील किराणा दुकारनांसह मेडिकलबाहेर सोशल डिस्टन्स ठेवून वस्तूंची विक्री केली जात आहे. बोदवडकरांनी दाखवलेल्या संयमाचे खर्‍या अर्थाने कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे. बोदवड नगरपंचायतीनेदेखील शहरात फवारणीला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक गल्लोगल्लीत नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी मोठठ्या प्रमाणात कसरत करून स्वच्छता मोहिम राबविण्यात मग्न आहेत. एकीकडे शहरात गोळा होणारा कचरा गोळा केला जात आहे तसेच शहरात स्वच्छता पाळा व घरातच राहा, बाहेर कुणीही फिरू नये, असे आवाहन नगरपंचायतीच्या मुख्यधिकारी यांनी केले आहे.

अवैध दारू विक्रीलाही लागावेत निर्बंध
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी लागू झाली आहे. यामुळे शहरातील काही भागात अवैध दारू विक्रीला ऊत आला आहे. लॉक डाऊनला गांभीर्याने घेतले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता शासनाने सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे बोदवड शहरात अवैध दारू विक्रीला जणू महापूरच आलेला आहे. शहरातील मलकापूर रोड, जामठी रस्त्यावर, मुक्ताईनगर रस्त्यावर, यासह विविध भागात सर्रास दारू विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे मूळ किंमतीपेक्षा दारू कमी भावात विकली जात असल्यामुळे ती बनावट असल्याचे स्पष्ट आहे. भविष्यात यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

बोदवडमध्ये सोशल डिस्टन्स
कोरोणा संसर्गाच्या खबरदारीसाठी पोलिसांचे सोशल डिस्टन्स इन मेडिकल, दूध डेरी समोरील ग्राहकांसाठी विशेष उपाय योजना कोरोणा विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राबवलाजात आहे. शहरातील मेडिकल तसेच दूध डेअरीसमोर होणार्‍या गर्दीतून संसर्ग टाळण्यासाठी बोदवड पोलिस विभागाच्या वतीने सोशल डिस्टन हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता सामाजिक बांधीलकी म्हणून पोलीस विभागाच्या वतीने शहरातील मेडिकल डेअरीसमोर ग्राहकांची एकच गर्दी होती तर या गर्दीमुळे संसर्गाचा प्रभाव होऊ नये यासाठी येणार्‍या ग्राहकांसाठी अभिनव उपक्रम शहरातील मेडिकल व दूध डेअरी समोर राबविण्यात येणार असून या उपक्रमात शहरातील मेडिकल दुकानदार मालकांनी स्वतः पुढाकार घेऊन सोशल डिस्टन्स चौकटी आखून सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील खरे यांनी केले आहे.