बोदवडमधील अमर प्रोव्हिजनच्या मालकाविरूध्द गुन्हा

0

चढ्या भावाने किराणा मालाची विक्री केल्याच्या तक्रारीची प्रशासनाकडून दखल

बोदवड : संचारबंदीचा फायदा घेत चढ्या भावाने किराणा मालाची विक्री करून अधिक नफा मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍या शहरातील मलकापूर रोडवरील किराणा दुकानदार मालकाविरूध्द बोदवड पोलिसात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथीचे रोगप्रतिबंध कायदा कलम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

अखेर गुन्हा झाला दाखल
कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता शासनाने लावलेल्या संचारबंदीचा फायदा शहरातील काही किराणा दुकानदार घेत असल्याचा सुरूवातीपासून आरोप होत होता. त्यातच शहरातील मलकापूर रोडवरील प्रीतम शांतीप्रकाश खत्री यांच्या मालकीच्या अमर प्रोव्हीजनमध्ये वाजवीपेक्षा जास्त किंमतीने किराणा मालाच्या वस्तुची विक्री केली जात असल्याने शेलवड येथील रहिवाशी असलेले व हल्ली बोदवड येथे राहत असलेले दीपक संतोष माळी यांनी याबाबत संबधित किराणा दुकानदारांवर ग्राहक संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार तहसीलदार रवींद्र जोगी यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने नायब तहसीलदार दीपक कुसकर यांना संबधित दुकानावर जावून पंचनामा केला असता त्यात संबधित दुकानदारांकडून चढ्या भावाने किराणा मालाची विक्री होत असल्याचे दिसून आले. संबधित दुकानाबाहेर भावफलकदेखील सुध्दा लावण्यात आले नसल्याचे व ग्राहकाला पक्के बिल देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे नायब तहसीलदार दीपक कुसकर यांच्या लेखी पंचनाम्यात व माहितीनुसार बोदवड पोलिसात दुकान मालक प्रीतम शांतीप्रकाश खत्री यांचे विरुध्द भा.दं.संहिता 1860 च्या कलम 188 नुसार तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास कालिचरण बिर्‍हाडे करीत आहेत. आपत्ती काळात चढ्या भावाने किराणा माल विक्री करण्याच्या दुकानदारावर गुन्हा दाखल होण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.