रेशन कार्ड बनवून देण्यासाठी स्वीकारली तीन हजार 600 रुपयांची लाच : स्वस्त धान्य दुकानदाराकडे लाच मागितल्यानंतर कारवाई
बोदवड : नवीन रेशन कार्ड बनवून देण्यासाठी तीन हजार 600 रुपयांची लाच मागणार्या बोदवड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील लाचखोर अव्वल कारकून संजय देविदास पाटील, (41, रा.देवपूर, धुळे) यास जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी लाच घेताना रंगेहाथ अटक केल्याने तहसील वर्तुळातील भ्रष्टाचारी अधिकार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
स्वस्त धान्य दुकानदाराकडे मागितली लाच
48 वर्षीय तक्रारदार यांचे बोदवड तालुक्यात स्वस्त धान्य दुकान असून गावातील स्वस्त धान्य दुकानाच्या अंतर्गत येणार्या तीन नागरीकांचे नवीन रेशनकार्ड बनविण्यासाठी आरोपी अव्वल कारकून संजय पाटील याने 12 डिसेंबर रोजी प्रत्येक कार्डाप्रमाणे एक हजार 200 रुपये लाच मागितली होती. तक्रारदाराने या प्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपी संजय पाटील याने मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयाच्या आवारात लाच स्वीकारताच पंचांसमक्ष त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव एसीबीचे उपअधीक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक निलेश लोधी, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, हवालदार अशोक अहिरे, नाईक मनोज जोशी, नाईक जनार्दन चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.