जळगाव : बोदवड येथील शुभम नंदू माळी या तरुणाचा जामनेरजवळील कांग नदीच्या पुलावरून फेकून खून करण्यात आला होता. या प्रकरणी नातेवाईकांनी सुरूवातीपासून या तरुणाचा घातपात झाल्याने गुन्ह्याचा तपास लावण्याची मागणी केली होती. जळगाव गुन्हे शाखेने अखेर या गुन्ह्याची उकल केली असून या प्रकरणी मामेभाऊ पवन अशोक माळी (रा. बोदवड) याला रविवारी अटक केली आहे. उसनवारीच्या 45 हजार रुपयांवरून आरोपी मामेभावाने हा खून केल्याची कबुली दिली आहे.
अखेर नातेवाईकांचा संशय ठरला खूर
31 जानेवारी रोजी सकाळी शुभमचा मृतदेह जामनेर-बोदवड रस्त्यावरील कांग नदीपात्रात आढळून आला. जवळच दुचाकीही पुलाखाली पडली होती. गुजरात येथुन ट्रक चालवून येत असलेल्या शुभमने धुळ्यातून कुटुंबीयांना फोन केला होता. मध्यरात्री घरी येईल, असा निरोप त्याने दिला होता. परंतु दुसर्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह मिळाला. सुरूवातीला हा अपघात असल्याचे दिसून येत होते. त्या अनुषंगाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पण हा खुनच असल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता.
उसनवारीच्या पैशातून काढला काटा
आतेभाऊ-मामेभाऊ दोघे ट्रकचालक आहेत. पवनचे 45 हजार रुपये शुभमकडे घेणे होते. घटनेच्या दिवशी दोघेही गुजरात येथून जामनेरकडे येत होते. बोदवडमार्गे जाताना दोघे भेटले. पैशांच्या उसनवरीतून दोघांमध्ये भांडण झाले. पवनने शुभमला मारहाण केली. त्यानंतर कांग नदीच्या पुलावरुन त्याला खाली फेकले. यानंतर पुलाच्या दुसर्या बाजुने दुचाकी खाली फेकली. नेमका हाच मुद्दा पोलिस तपासात महत्त्वाचा ठरला. अपघात झाला असता तर दुचाकी व मृतदेह एकाच बाजुला पडला असता त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला. घटनेच्या एक दिवस आधी दोघांमध्ये मोबाईलवर बोलणे झाले होते पण प्रत्यक्ष घटनेवेळी पवनचा मोबाइल बंद होता त्यामुळे संशय बळावला. यानंतर घटनेवेळी पवन कुठे होता? याचा तपास केला. अनेकांशी बोलून माहिती काढली. 13 दिवसांपासून पवनच्या हालचालींवर लक्ष ठेवले. बोदवड, जामनेर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक टँकर दिसून आले. या टँकरचा चालक पवन असल्याचा संशय होता. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, एएसआय अशोक महाजन, सुनील दामोदरे, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, चालक मुरलिधर बारी यांनी हा गुन्हा उघडकीस आणला तर तांत्रिक सहाय्य हवालदार संदीप सावळे, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांनी केले.