बोदवड (रवींद्र मराठे) : बोदवड शहराच्या मध्यभागी व पोलिस स्टेशननजीक असलेल्या सारंगी तलावाभोवती अतिक्रमण वाढले आहे शिवाय या तलावात जलपर्णी वनस्पतीदेखील वाढल्याने सुज्ञ नागरीकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तलावामुळे जलपातळीत वाढ
पाण्याने तलाव पूर्ण भरल्यानंतर त्यामुळे शहरातील विहिरींसह बोअरवेलच्या पातळीत मोठी वाढ होत होती शिवाय आठ-दहा दिवसाआड पाणीपुरवठा झाला तरी विहिरींची जलपातळी वाढल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळात होता. सारंगी तलावात येणार्या पाण्याचा मार्ग काही नागरीकांनी बांधकाम करून अडवला आहे शिवाय तलावात आता केवळ जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे शिवाय तलाव काठावरही ती पडून असल्याचे चित्र आहे. गुरा-ढोरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असलेल्या तलावात आजमितीला मोठ्या प्रमाणावर गाळ वाढला आहे.
अतिक्रमणाची डोकेदुखी
काही महिन्यांपूर्वी नगरपंचायतीने जलपर्णी वनस्पती हलवण्याबाबत निविदा काढली होती शिवाय सारंगी तलावाचा गाळ काढणे, खोलीकरण तसेच सुशोभीकरण आणि पिचिंगच्या कामाला मंजुरी मिळाली होती. ठेकेदाराने कामाला सुरुवात केल्यानंतर जलपर्णी वनस्पती हटवण्यात आली मात्र तलावातील गाळ व जलपर्णी हटवण्यासाठी ट्रॅक्टर जाण्यासही रस्ता नसल्याची अडचण आहे. जलपर्णी वनस्पतीचे ढीगच्या ढीग तलावाच्या कडेला पडून आहे शिवाय हा तलाव हा लघू सिंचन विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे ट्रॅक्टर तलावाच्या बाहेर निघण्यासाठी रस्ता मोकळा होणे गरजेचे आहे. त्यानुसार लघुसिंचन विभागाने सदर अतिक्रमण नगरपंचायत अखत्यारीत येत असल्याचे म्हणून नगरपंचायतीकडे पत्रव्यवहार केला आहे व पोलिस प्रशासनाला सुद्धा पत्र देण्यात आले आहे. मात्र अद्यापही अतिक्रमण आतापर्यंत निघालेले नाही तसेच पावसाचे पाणी तलावात वाहून येण्यासाठी मार्गही नाही. सारंगी तलावावरील अतिक्रमण हटवावे, अशी अपेक्षा सुज्ञ बोदवडकरांमधून व्यक्त होत आहे.