बोदवडमध्ये किराणा मालाची चढ्या भावाने विक्री

0

तहसीलदारांकडून पोलिस प्रशासनाला चौकशीचे आदेश

बोदवड :कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता शासनाने लावलेल्या संचारबंदीचा फायदा शहरातील काही किराणा दुकानदार घेत असल्याची चर्चा आहे. शहरातील मलकापूर रोडवरील प्रितम शांतीप्रकाश खत्री यांच्या मालकीचे अमर प्रोव्हीजन येथे वाजवी पेक्षा जास्त किंमतीने किराणा मालाची वस्तुची विक्री केली जात असल्याने बोदवड शहरातील दीपक संतोष माळी यांनी याबाबत संबधित किराणा दुकानदारांवर ग्राहक संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार तहसीलदार रवींद्र जोगी यांच्याकडे केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने नायब तहसीलदार दीपक कुसकर यांना संबंधित दुकानावर जावून पंचनामा केला.

पोलिसांना कारवाईचे आदेश
यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील, तक्रारदार दीपक माळी उपस्थित होते. याबाबत सखोल चौकशी करून संबधितांवर कारवाई करुन केलेल्या कारवाईचा अहवाल तहसिल कार्यालयाकडे पाठवण्यात यावा, असे चौकशीचे आदेश तहसील प्रशासनाकडून पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहेत. संचारबंदी लागु झाल्यापासुन शासन नागरीकांची कोणत्याची प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी विविध स्तरावर उपाय योजना करीत असून जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी किराणा दुकाण,मेडिकल, दुध विक्रेत्यांना यांना दुकान सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरीकांच्या सोयीसाठी अन्न- धान्य पुरविण्यासाठी सुविधा करीत आहे तसेच शहरात विविध सेवा भावी नागरीक मोलमजुरी करणार्‍यांसाठी जीवनाश्यक वस्तुचे वाटप करून मदतीचा हात पुढे करीत असतांना शहरातील काही किराणा दुकानदार वाजवीपेक्षा जास्त किमंतीने तेल, साखर, तांदुळ, दाळ इत्यादी वस्तुंची चढ्या भावाने विक्री करीत असल्याने नागरीकांच्या आर्थिक अडचणीत भर पडत आहे.