बोदवडमध्ये युवकावर हल्ला : नगराध्यक्ष पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा

0

बोदवड : अर्ज फाटे जास्त करतो या कारणावरून नगराध्यक्ष पतींसह सात जणांनी एकावर हल्ला करीत त्यास मारहाण केल्याने बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात नईमखान युसूफ खान (28, बागवान मोहल्ला, बोदवड) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी नगराध्यक्ष पती शे.सईद बागवान यांच्यासह शे.अस्लम बागवान, शे.हारुन बागवान, शे.रहीम बागवान, शे.दानिश बागवान, शे.इरफान बागवान, शे.साजीद बागवान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

धारदार वस्तू मारून केली दुखापत
नईमखान युसूफ खान यांच्या तक्रारीनुसार मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ते बागवान मोहल्ल्यातील पाण्याच्या टाकीजवळून दुचाकीने घरी जात असताना नगराध्यक्ष पती सईद बागवान यांचे लहान भाऊ असलम याने फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या खालील भागात लोखंडी पट्टीने वार करून दुखापत केली व आरोपी क्रमांक दोनने फिर्यादीच्या डोक्याच्या मागील डाव्या बाजूस काही तरी धारदार वस्तू मारून दुखापत केली तर फिर्यादी गाडीवरून खाली पडल्यावर आरोपी क्रमांक चार ते सात यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व नगराध्यक्ष पती सईद बागवान याने फिर्यादीला तू माझ्या काळात अर्ज फाटे जास्त करतो आणि या अगोदर तुला समजून सांगितले होते तरी तू ऐकत नाही म्हणून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल विलास महाजन करीत आहेत.

दुसर्‍या गटाचीही तक्रार : आठ जणांविरूद्ध गुन्हा
हाणामारी प्रकरणी दुसर्‍या गटातर्फे तक्रार दाखल करण्यात आली असून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार शे.दानिश शे.शकील बागवान यांच्या फिर्यादीनुसार नगराध्यक्ष यांचा मुलगा व पुतण्या यांना आरोपींनी लोखंडी पाईप व लाथाबुक्क्यांनी पोटावर व पाठीवर मुक्का मार मारून शिवीगाळ केली व तुम्हाला पाहून घेईल, असा दम दिला. या हाणामारीत शे.सोहेल शे.सईद बागवान (20, बागवान मोहल्ला, बोदवड) हेदेखील जखमी झाले. या प्रकरणी आरोपी नईम खान, मोईन खान, युसूफ खान, गुलाम खान, सलीम खान, हकीम खान, फरहान बागवान, अय्युब खान (सर्व रा.बागवान मोहल्ला, बोदवड) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास महाजन करीत आहेत.