बोदवडमध्ये संचारबंदीदरम्यान विनाकारण फिरणार्‍यांना ऊठ-बशांची शिक्षा

0

बोदवड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी असतानाही विनाकारण रस्त्यांवर फिरणार्‍यांना पोलिसांनी ऊठ-बशांची शिक्षा सुनावली. शहरात संचारबंदी असलीतरी गल्लोगल्ली काही नागरीक घोळका करून असल्याचे तसेच दुपारच्या वेळी पार्ट्यांसाठी शेतात जात असल्याने अशांवर कारवाई करण्याची अपेक्षा आहे. व्यापारी वर्गाने शहरात मोठ्या प्रमाणात दुकाने बंद ठेवली असून केवळ जीवनावश्यक वस्तू विक्री करणारी दुकानेच उघडी ठेवण्यात आली आहेत.

गल्लीत थांबणार्‍यांना लाठीचा प्रसाद
पोलिस प्रशासनाकडून गल्लोगल्ली जाऊन गर्दी करणार्‍यांना चांगल्या प्रकारे चोप जात असून ऊठ-बशा काढणची शिक्षा दिली जात आहे. शहरात येणार्‍या-जाणार्‍या दुचाकीस्वारांना थांबवून त्यांच्याकडून ओळखपत्र तपासले जात आहे. बाहेर गावाहून पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आदी मोठ्या शहरातून नागरीक दुचाकींवरून बोदवड शहरात दाखल होत आहेत. 50 ते 60 लोकांची नावाची नोंद घेऊन त्यांची तपासणी करून त्यांना कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेण्याबद्दल माहिती देऊन सोडले जात आहे.

हातावर पोट भरणार्‍यांचे जीवन कठीण
हातावर पोट भरणार्‍या नागरीकांची जीवन जगणे कठीण झाले आहे. काही लोकांनी बचत गटाच्या रक्कम घेऊन ठेवली आहे आणि त्यांना दर आठवड्यात त्या रकमेचा हप्ता हा भरावा लागतो. कोरोनाची मोठी आपत्ती आल्यामुळे हप्ते कसे भरावे ? हा नागरीकांना प्रश्‍न पडला आहे. काहींनी घरात लागणार्‍या शोभेच्या वस्तू, फ्रिज, टीव्ही, इत्यादी वस्तूची कर्जाचा रकमेचा हप्ता दर महिन्याच्या दोन तारखेला येत असतो पण जवळ पैसे नसल्याने हप्ते कसे भरावे ? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.