बोदवडला मातंग समाजाचा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा

0

विनोद चांदणेच्या मारेकर्‍याला शिक्षा देण्याची मोर्चेकर्‍यांची मागणी

बोदवड- जामनेर तालुक्यातील वाकडीचे ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांची हत्या करणार्‍या शेखर वाणी या आरोपीस फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर शुक्रवारी मातंग समाजबांधवांतर्फे आक्रोश मोर्चा काढणयात आला. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आक्रोश मोर्चाला सुरवात झाली. नायब तहसीलदार बी.डी.वाडीले यांना निवेदन देण्यात आले.

आरोपीला वाचवण्यासाठी मंत्र्यांचा दबाव
वाकडीचे ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांची 19 मार्च रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. चांदणे मातंग समाजाचे प्रतिनिधी असून त्यांची हत्या करणार्‍या शेखर वाणी याला जिल्ह्यातील मंत्र्यांचा पाठिंबा असल्याने आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. चांदणे यांच्या मृत्यूस असलेल्या आरोपीला फाशी वा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा करावी, अशी मागणी मोर्चेकर्‍यांनी केली. मातंग समाजाला न्याय मिळावा यासाठी सदरचे निवेदन राष्ट्रपती, संसद भवन येथे पोहचवावे, अशी मागणी मोर्चेकर्‍यांनी केली. मोर्चाप्रसंगी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. प्रसंगी राष्ट्रीय लहुजी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय श्रावण बोदडे, छगन अवसरमोल, पवन बांगर, विष्णू पवार, रघुनाथ अवसरमोल, रामा बांगर, अमर शिराळे, विक्रम चांदणे, गोपाल गागदेकर, अजय पवार, नितीन बांगर व तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते.