बोदवडला सिनेस्टाईल पाठलाग ; मारहाण करीत लुटले

बोदवड शहरातील नवीन तहसील कार्यालयाजवळील घटना : एका आरोपीविरोधात बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा

बोदवड  : चारचाकीचा सिनेस्टाईल पाठलाग करून लुटारूने चारचाकीतील इसमाला बेदम मारहाण करीत त्यांच्या हातातील दहा ग्रॅमची अंगठी व खिशातील दहा हजारांची रोकड हिसकावल्याची धक्कादायक घटना शहरातील नवीन तहसील कार्यालयाजवळ 15 जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी रोहित विवेक पांडे (24, बोदवड) विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

सिनेस्टाईल केली लूट
तक्रारदार अनुपसिंग देविसिंग हजारी (50, प्रभाग क्रमांक दहा, पोस्टगल्ली, बोदवड) व त्यांचे मित्र विशालसिंग प्रदीपसिंग परदेशी यांच्यासोबत चारचाकीने बोदवडकडे जामनेर-बोदवड रस्त्यावरून जात असताना संशयीत आरोपी रोहित पांडेने चारचाकीचा दुचाकीने पाठलाग करून नवीन तहसील कार्यालयाजवळ दुचाकी चारचाकीपुढे आडवी लावली. यावेळी आरोपीने अनुपसिंग यांना वाहनाच्या खाली खेचत हातातील फायटरने तोंडावर व पोटावर बेदम मारहाण करून जखमी केले तसेच खिशातील दहा हजारांची रोकड व हातातील दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी बळजबरीने हिसकावली व त्याचवेळी विशालसिंग यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांनाही मारहाण केली व ही बाब कुणाला सांगितल्यास परीवाराला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तपास सहाय्यक निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.