बोदवड । तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या वाहनाला साळसिंगी गावाजवळ अपघात झाल्याने चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. वाहनासमोर अचानक एक इसम आल्याने त्यास वाचवताना ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. याबाबत बोदवड पोलिसात मात्र नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
अपघातग्रस्त वाहन शासकीय विश्रामगृह आवारात
तहसीलदार थोरात यांना कामानिमित्त मुंबई येथे जावयाचे असल्याने ते शासकीय वाहन (एम.एच.19 एम. 0559) घेऊन भुसावळकडे निघाले. या वाहनावर कायमस्वरुपी चालक नसल्याने कार्यालयातील कोतवाल ज्ञानेश्वर सुरळकर यांची मदत घेण्यात आली. सुरळकर हे भुसावळ येथून बोदवड परतत असताना साळसिंगीजवळ अचानक एक इसम गाडीसमोर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन उलटले. या अपघातात सुरळकर जखमी झाले असून त्यांना भुसावळ येथे उपचारार्थ हलवण्यात आले. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले. सोमवारी सकाळी अपघातग्रस्त वाहन शासकीय विश्रामगृहाच्या आवारात आणण्यात आले.
मुंबई जावयाचे असल्याने कोतवाल ज्ञानेश्वर सुरळकर यांना चालक म्हणून सोबत घेतले. परतीच्या प्रवासात एका इसमास वाचवताना वाहन उलटले. पोलीस निरीक्षकांशी बोलणे झाले असून वाहनाची कागदपत्रे मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची येईल.
-भाऊसाहेब थोरात, तहसीलदार, बोदवड