बोदवड तालुक्यातील पाच गावांमध्ये होणार थेट सरपंच निवड

0

बोदवड । तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यामध्ये धोंडखेडा, निमखेड, कोल्हाडी, वडजी व चिंचखेड प्र.बो. या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 15 ते 22 सप्टेंबर सार्वजनिक सुटी वगळून सकाळी 11 ते 4.30 यावेळेत नामनिर्देशनपत्र उमेदवाराने तहसील कार्यालयात सादर करायचे आहे. सोमवार 25 रोजी सकाळी 11 वाजेपासून छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख 27 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. वैध उमेदवारांची अंतीम यादी व चिन्हवाटप 27 रोजी दुपारी 3 वाजेनंतर प्रसिध्द करण्यात येईल तर मतदान 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत घेण्यात येईल. यानंतर मतमोजणी 9 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात होणार आहे.

निवडणूकीसाठी असे आहेत निकष
महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अध्यादेश 19 जुलै 2017 कलम 11 अन्वये मुख्य अधिनियम सुधारणा कलम 30 सुधारणा करुन पोट कलम 30अ 1अ(2) नुसार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच सरपंचपदाची थेट निवडणूक घेण्यात येईल, अशी सुधारणा करण्यात आली आहे, असे तहसीलदार तथा राज्य निवडणूक आयोग प्राधिकृत अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी नमुना अ निवडणुकीची नोटीसद्वारे प्रसिध्द केले आहे. सरपंचपदासाठी सातवी पास अट आहे.

ग्रामपंचायत सदस्यांचा घोडेबाजार थांबणार
1 जानेवारी 1995 किंवा त्यानंतर जन्मलेली असल्यास
किमान सातवी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्यामुळे मतदारांना अच्छे दिन आले आहे. ग्रामपंचायत सदस्यांना मात्र सरपंच निवडीसाठी बहुमताच्या घोडे बाजारापासून वंचीत राहावे लागणार आहे.

बैठका झाल्या सुरु
निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील गावपुढारी सक्रिय झाले आहेत. चौका चौकांमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठका सुरु झाल्या असून सरपंच पदासाठी कोण उमेदवारी लढविणार कुणाला कुणाचा पाठींबा मिळणार, काय राहणार सामाजिक गणिते यावर चर्चा रंगतांना दिसून येत आहे. यावेळेस सरपंच निवडणूक हि थेट जनतेतून असल्यामुळे गावातील अनेक हवशे – नवशांच्या आशांना पालवे फुटले असून निवडणूकीचे स्वप्ने रंगवितांना दिसून येत आहेत. सर्व गणिते अवलंबून आहेत. सरपंचपदाच्या
उमेदवाराला त्यापुर्वी फक्त वॉर्डापुरतेच मते मागावी लागत असत, आता मात्र संपूर्ण गावातील मतदारांच्या पायावर डोके ठेवावे लागणार आहे.