बोदवड तालुक्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला
बोदवड : शहरातील मूळ रहिवासी एका 40 वर्षीय व्यापारी कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील म्हसोबा मंदिर परीसरात राहणार्या व्यापार्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते तर त्याबाबतचा अहवाल मंगळवारी सकाळी पॉझीटीव्ह आल्याने खळबळ उडाली. प्रशासनाने म्हसोबा मंदिर परीसर सील केला असून व्यापार्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
आरोगय विभागाकडून गांभीर्याने दखल
संबंधीतावर पाच दिवसांपासून जळगाव येथे उपचार सुरू असून उपचारादरम्यान घेतलेले त्यांचे स्वॅब पॉझीटीव्ह आले असून या व्यापार्याच्या संपर्कात कुटुंबातील 12 जण आल्यानंतर त्यांच्यात काही कोरोनाची लक्षणे आढळून येतात का? याची आरोग्य विभागाच्या अधिकार्यांकडून चौकशी सुरू आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून जलदगतीने तपास मोहिम सुरू आहे. नगरपंचायतीच्या वतीने म्हसोबा मंदिर परीसरात निर्तंतुकीकरण करण्यात आले असून परीसरात येणारे विविध मार्ग तसेच गल्ल्या सील करण्यात आल्या आहेत.
प्रभाग 16 व 17 प्रतिबंधीत क्षेत्र
म्हसोबा मंदिराजवळील भाग प्रभाग क्रमांक 16 व 17 प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणार्या आस्थापनांशी समन्वय म्हणून नगरपंचायतीकडून कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नितीन पंडित मराठे, अंकुश मराठे, विशाल जाधव या कर्मचार्यासह स्वयंसेवक म्हणून शांताराम कोळी, निलेश माळी, भास्कर गुरचळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर नोडल अधिकारी म्हणून नगरपंचायतीकडून रीतेश भाऊसाहेब बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली.