बोदवड। तालुक्यातील पळासखेडे बु. येथील दोन मुली जलचक्र बुद्रुकच्या लघु पाटबंधारे तलावावर दुपारी कपडे धुण्यासाठी गेल्या असता पाय घसरल्याने तोल जाऊन पडल्या. मात्र त्यांना पाण्याबाहेर येता न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही बाब इतर मुलींनी गावातील लोकांना सांगितल्यावर त्यांना बाहेर काढण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या मृत्यू पावलेल्या मुलींपैकी पल्लवी सुपडू सुरवाडे नववीत शिकत होती तर रेणूका सुभाष सुरवाडेने शाळा सोडली होती. बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मदतीला विलंब
या मुली तलावात बुडाल्या तेव्हा त्या बुडत असल्याचे लवकर अन्य मुलींच्या लक्षात आले नाही. त्यांना वाचविण्यासाठी तात्काळ प्रयत्न करण्याचे धाडसही या मुलींनी दाखविले नाही. त्यांनी गावात जाऊन माहिती देईपर्यंत वेळ वाया गेल्याने त्यांना वाचविण्यासाठी मदत देण्यासाठी विलंब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
करंजी फाट्याजवळ अपघातात दोन ठार
दुसर्या घटनेत बोदवड- भुसावळ रस्त्यावरील करंजी फाट्याजवळ सकाळी दोन मोटार सायकलस्वार अपघातात ठार झाले. दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्यामुळे करंजी येथील डॉ. प्रविण शेळके यांचा जागीच मृत्यू झाला तर भुसावळ येथील विजय किनगे (रा. आनंदनगर) यांचा उपदारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. डॉ. प्रविण शेळके यांच्या डोक्यात हेल्मेट असतानासुध्दा जबर मार लागून अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी राख वाहणार्या डंपरने कट मारल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले. डॉ. प्रविण शेळके येवती प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून सेवेत होते. त्यांच्यासमवेत असलेल्या वंदना राऊत यांच्यावर उपचार सुरु आहे.