बोदवड । शासनाच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बोदवड तालुका हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यात 38 ग्रामपंचायतींना देण्यात आलेला इष्टांक पुर्ण करण्यात आल्यामुळे तालुका हागणदारीमुक्त झाला असल्याचे शासनातर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले. मात्र तालुक्यातील स्थिती याउलट असून हागणदारी मुक्ती केवळ कागदोपत्री असून संपुर्ण ता लुक्यात चित्र जैसे थे आहे. यामुळे रोगराईचे प्रमाणही वाढले असल्याचे दिसून येते.
9 हजार 133 शौचालयांचे उद्दीष्ट
तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 9 हजार 133 शौचालयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. ते उद्दीष्ट फक्त कागदोपत्रीच झाल्याचे चित्र दिसत असून हागणदारीचे चित्र मात्र कायम आहे. यामुळे रोगराईचे प्रमाण वाढले असून दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. यात बहुतांश टायफाईट, हगवण, सर्दी, खोकल, हिवताप यांचा समावेश आहे.
या गावांमध्ये सुधारणा करण्याची गरज
तालुक्यातील एकूण 38 गावांमध्ये 9 हजार 133 शौचालय पुर्ण करण्यात आले आहेत. परंतु शेलवड, मुक्तळ, शिरसाळा, पळासखेडे बु., जलचक्र बु. जलचक्र खुर्द, जामठी, येवती, मनूर बु. मनूर खुर्द, आमदगाव, गोळेगाव, करंजी, राजूर, वरखेडे बु. वरखेडे खुर्द, निमखेडे या गावात थोडी देखील सुधारणा झालेली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तालुक्यात हागणदारीमुक्तीचे बारा बाजल्याचे दिसून येते. याठिकाणी नियमितपणे गुडमॉर्निंग पथकाद्वारे जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
अन्यथा कारवाई करावी
राज्याच्या पथकाद्वारे केवळ दर्शनी भागाचीच पाहणी करण्यात आली असल्याची टीका नागरिकांकडून केली जात असून तालुक्यातील ग्रामीण भागात पाहणी केली असता बहुतांश गावात अजूनही हागणदारीची समस्या कायम आहेच. नागरिक रस्त्याच्या दुतर्फा शौचास बसतात सध्या पावसाळ्याचे दिवस अत्यामुळे यातून दुर्गंधी फैलावून परिसरात रोगराई पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासनासह पंचायत समिती प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. या बाबींना अटकाव आणण्यासाठी व्यापक स्तरावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येऊन गुडमॉर्निग पथकाच्या माध्यमातून पहाटेच्या सुमारास उघड्यावर बसणार्यांवर कारवाई करण्यात आल्यास यास काही प्रमाणात का होईना अटकाव येऊ शकतो.